आंबोली : आंबोलीने आज रविवारी रेकॉर्डब्रेक अशी लाखो पर्यटकांची मांदियाळी अनुभवली. मात्र, या पर्यटकांच्या गर्दीमुळे आंबोलीच्या सुमारे १४ किलोमीटर रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झालेला होता. या वाहतुकीच्या कोंडीमुळे आंबोलीतील वाहतूक सहा तास खोळंबलेलीच होती. यातच अपुऱ्या पोलीस बंदोबस्तामुळे दुपारच्या सुमारात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या कोल्हापूर येथील मद्यपी पर्यटकांना ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागले.पावसामुळे जून महिन्यात सुरु होणारे पर्यटन पावसाच्या लांबलेल्या आगमनामुळे उशिरा सुरु झाले. परंतु, श्रावणासाठी काही दिवस उरलेले असतानाच आंबोली पर्यटकांनी फुललेली दिसून आली. रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधत आंबोली पर्यटनाची पंढरी बनली होती. कोल्हापूर, गोवा, कर्नाटक, रत्नागिरी यासह जिल्ह्यातील पर्यटकांनीही आंबोलीतील धुक्यामध्ये पावसाच्या रिमझिम धारांमध्ये धबधब्याचे पाणी अंगावर घेत मौजमजेसाठी आंबोलीत गर्दी केली होती. सुमारे लाखभर पर्यटक रविवारच्या दिवसभरात आंबोलीतील मुख्य धबधब्यांसह छोट्या धबधब्यात आनंद लुटत होते. मुख्य धबधब्यावरील गर्दी पाहून बऱ्याचशा पर्यटकांनी कावळेसाद, नांगरतास आदी ठिकाणवरही जात आस्वाद घेतला.आंबोलीत रविवारी मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांमुळे वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडून गेली. येथील काही पर्यटकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी स्टॉलच्या समोरच गाड्या उभ्या केल्या होत्या. त्यानंतर वाहनांची गर्दी वाढत गेली. आणि वाहनांचा झालेला गोतावळा सोडविताना पोलिसांची व ग्रामस्थांच्या नाकीनऊ आले. वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे आंबोलीतील दोन्ही बाजूच्या सुमारे चौदा किलोमीटर अंतरापर्यंत गाड्या कोंडी सुटण्याची वाट पाहत सुमारे सहा तास उभ्या होत्या. या गाड्यांमधील पर्यटकांनी पायी चालतच मुख्य धबधब्यापर्यंत जाणे पसंत केले. रविवार म्हणजे आंबोलीतील पर्यटनाला बहर येतो. हे माहिती असूनही केवळ २५ पोलिसांचा ताफा तैनात होता. यामुळे मद्यपी तसेच वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या पर्यटकांकडे पाहत राहण्याशिवाय पोलीस काहीही करत नव्हते. आंबोलीतील पर्यटनाला आतापर्यंत एवढा प्रतिसाद लाभलेला नसल्याने पोलिसांची कमी कुमक ठेवण्यात आली होती. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर झाला. तसेच पोलिसांसमोरच दंगामस्ती करणाऱ्या मद्यपी पर्यटकांवरही कारवाई करण्यास पोलीस धजावत नव्हते. त्यामुळे यापुढील कालावधीत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत होती. (वार्ताहर)
आंबोलीने अनुभवली पर्यटकांची मांदियाळी
By admin | Updated: July 20, 2014 22:13 IST