कोल्हापूर : ‘प्लीज, आम्हाला एक फोन लावायचा आहे, तुझा फोन देताेस का?’ अशी विनवणी करुन मोबाईल फोन घेतला अन् काही क्षणातच फोन घेऊन दुचाकीवरुन धूम ठोकल्याची घटना करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे घडली. याबाबत अज्ञात दोघांविरोधात मोबाईल चोरीची तक्रार अभिषेक दादासाहेब भोसले (वय १९, रा. शिरोली, ता. हातकणंगले) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अभिषेक भोसले याचा टेम्पो आहे. त्याच्या टेम्पोचा टायर निगवे दुमाला येथे पंक्चर झाल्याने तो पंक्चर काढून आणून टायर टेम्पोला बसविण्यासाठी धडपडत होता. त्याचवेळी दोन अनोळखी युवक दुचाकीवरुन त्याच्याजवळ आले व त्यांनी ‘प्लीज, आम्हाला एक फोन लावायचा आहे, तुझा फोन देतोस का?’ अशी विनंती केली. त्यानंतर त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने त्याच्या हातातील मोबाईल हिसडा मारुन काढून घेतला व ते दोघेही दुचाकीवरच बसून होते. मोबाईल फोन घेऊन कॉल करण्याचे निमित्त करुन त्यांनी अचानक दुचाकी सुरु करुन मोबाईल घेत कुशिरे गावच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी भोसले याने आरडाओरडा केला, पण तोपर्यंत मोबाईल चोरुन ते दोघेही गायब झाले होते. मोबाईल चोरीप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात तक्रार दाखल झाली आहे.