कोल्हापूर : लोकसहभागातून एखादी चळवळ दीर्घ काळ चालविणे अत्यंत कठीण काम असते. त्यासाठी संयम आणि चिकाटी महत्त्वाची असते. परंतु कोल्हापूर महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेने ही चिकाटी जपत महास्वच्छता अभियान ९९ आठवडे राबविले. आता १०० वे अभियान उद्या, रविवारी शहरात राबविले जात आहे.
महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिवसापासून डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरात प्रत्येक रविवारी लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या पहिल्या दोन, चार आठवड्यानंतर हे अभियान बंद पडेल, अशीच चर्चा होत होती. परंतु कलशेट्टी यांनी शहरातील विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांना प्रोत्साहन देऊन अभियानात सातत्य राखले.
शहरातील या अभियानात विविध सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी भाग घेतला. २०१९ चा महापूर आणि २०२० मधील कोरोना संसर्गाच्या काळातही हे अभियान सुरूच राहिले. शारीरिक अंतर ठेवून आतापर्यंत सहभाग नोंदविला. परंतु त्यात खंड पडू दिला नाही. महापालिकेवर सातत्याने टीका व्हायची, परंतु कलशेट्टी यांच्या प्रयत्नातून नागरिकांचा पालिका प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि प्रत्येक रविवारी लोक रस्त्यावर येऊन स्वच्छता करायला लागले.
या अभियानाचा येत्या रविवारी १०० वा रविवार असून, या महास्वच्छता अभियानामध्ये कोल्हापुरातील सामाजिक संस्थांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
या अभियानात शहरातील हेरिटेज वास्तूंची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड, रंकाळा टॉवर परिसर, राजाराम बंधारा, इराणी खण, यल्लमा मंदिर, महालक्ष्मी मंदिर, छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळ परिसर, पंचगंगा नदी घाट परिसर, शिवाजी विद्यापीठ मेन रोड, कोटितिर्थ तलाव, रेल्वे स्टेशनसमोरील परिसर व तांबट कमान या ठिकाणी अभियान राबविण्यात येणार आहे.