कोल्हापूर : गेल्या आठवड्यात जरासा तेजीत आलेला टोमॅटो आता पुन्हा एकदा गडगडला आहे. लाल भडक टोमॅटोच्या किलोचा दर १० रुपये झाला आहे. कांद्याचे दर कमी होतील असा अंदाज असताना ते पुन्हा किलोला पन्नास रुपयांच्यावर पोहोचले आहेत. मागणी वाढल्याने लसणाचे दरही वाढू लागले आहेत. लक्ष्मीपुरीत रविवारी आठवडा बाजार अननस आणि कलिंगडांनी फुलला होता. १० ते २० रुपये अशा कवडीमोल दराने कलिंगड विकले जात आहे. अननस २० ते ४० रुपये प्रति नग आहेत.
उन्हाचा चटका वाढू लागल्याने भाजीपाल्याच्या दरात तेजी सुरू होईल, असा कयास बांधला जात होता. पण बाजारात चित्र स्वस्ताईचेच दिसत आहे. कांदा १५ रुपये सोडला तर मेथी, शेपू, पालक, पोकळा, अंबाडा या भाज्या दहा रुपयांना एक दोन या निच्चांकी दरानेच विकल्या जात आहेत. फळभाज्यांचीही आवक वाढू लागली असून गवार सोडली तर सर्व फळभाज्या २० ते ३० रुपये किलोच्या पटीतच आहेत. कोबी, फ्लॉवरच्या दरात किंचित सुधारणा झाली असून एका गड्ड्याची किंमत पाच वरून दहावर पोहोचली आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्याने कोबीची मागणी वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारात काकडी, गाजराचे ढीग लागले असून दरही आदळले आहेत. मागील आठवड्यात ४० रुपये किलो असणारा भाव आता २० ते ३० रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. मटारचीही तीच अवस्था आहे. २५ ते ३० रुपये किलोचा भाव आहे.
मागील आठवड्यापर्यंत भाव खाल्लेल्या बटाट्याचे दर आता वेगाने कमी होऊ लागले आहेत. १५ ते २० रुपये किलोचा भाव झाला आहे. कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. बऱ्यापैकी ओला कांदा आहे. लसूणही ८० वरून वाढत जाऊन १२० रुपये किलोवर गेला आहे. आता तिखटाची चटणी करण्यासाठी कांदा, लसणाची मागणी असल्याचा फायदा घेतला आहे.
फळ बाजारात रामफळाची आवक दिसत आहे. किलोचा भाव २०० ते २५० रुपये असा आहे. चिकूची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने २० ते ३० रुपये किलोने विकला जात आहे.
फोटो: २१०२२०२१-कोल-बाजार ०१
फोटो ओळ: कोल्हापुरात रविवारी लक्ष्मीपुरी बाजारपेठेत अननसाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने जागोजागी असे ढीग दिसत आहेत.
(छाया: नसीर अत्तार)