कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी आज, मंगळवारी जिल्ह्यातील २६ केंद्रांवर मतदान होत आहे. १७ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात असून, सर्वच गटांत दुरंगी लढत होत आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, जनसुराज्य, शिवसेना यांची राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी व भाजप-शिवसेनेची राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी यांमध्ये लढत होत आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदान होणार आहे. करवीर तालुक्याचे मतदान कोल्हापूर येथे महापालिका शाळा क्रमांक ९ मध्ये होत आहे. जिल्ह्यातील २६ केंद्रांवर २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, सोमवारी दुपारीच साहित्य केंद्रावर पोहोच करण्यात आले आहे. दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित येत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. करवीर, हातकणंगले, पन्हाळा, राधानगरी तालुका विकास संस्था गट बिनविरोध झाला. उर्वरित १७ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात आहेत. कृषी पणन, शेती संस्था, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त, अनुसूचित जाती व महिला गटात फारशी चुरस नाही. नागरी बॅँका गटात मात्र सत्तारूढ आघाडीकडून प्रा. जयंत पाटील व शिवसेना-भाजप आघाडीकडून अनिल पाटील यांच्यात निकराची लढाई होत आहे. या गटात गेले आठ-दहा दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्याने धक्कादायक निकालाची चर्चा सुरू आहे. मतमोजणी गुरुवारी (दि. ७) रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय गोदामात होणार आहे. ३६ टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे. विकास संस्था गटातील निकराची झुंज तालुका व उमेदवारांचे नाव : आजरा- अशोक चराटी व जयवंतराव शिंपी, भुदरगड - के. पी. पाटील व नंदकुमार ढेंगे, चंदगड - गोपाळराव पाटील व नरसिंगराव पाटील, गडहिंग्लज - बाबासाहेब आरबोले व संतोष पाटील, गगनबावडा - पी. जी. शिंदे व मानसिंग पाटील, कागल - हसन मुश्रीफ व दत्तात्रय वालावलकर, शाहूवाडी- मानसिंगराव गायकवाड व सर्जेराव पाटील-पेरीडकर, शिरोळ - राजेंद्र पाटील-यड्रावकर व विठ्ठलराव नाईक-निंबाळकर.
जिल्हा बॅँकेसाठी आज मतदान
By admin | Updated: May 5, 2015 01:19 IST