कोल्हापूर : शिवपुत्र संभाजी राजांच्या स्फूर्तिदायी आयुष्याचा धगधगीत प्रवास आता कोल्हापूरकरांना ‘नरशार्दुल राजा संभाजी’ या चरित्र नाटकातून अनुभवता येणार आहे. इतिहास सांगणाऱ्या या चरित्र नाटकाचा प्रारंभ शनिवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात होणार आहे, अशी माहिती लेखक इंद्रजित सावंत व दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.यावेळी इंद्रजित सावंत म्हणाले, स्वराज्याच्या सिंहासनावर अनभिषिक्त झालेल्या छत्रपती संभाजीराजे या नरशार्दुलाचे जीवनचरित्र आजही आपल्याला प्रेरणा देणारे आहे. त्यामुळेच स्वराज्य, स्वातंत्र्य यांची प्रेरणा देणारे शंभूचरित्र ‘नरशार्दुल राजा संभाजी’ या नाट्य रूपात आणले आहे. कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नाटकांद्वारे आजपर्यंत अन्याय सहन करीत असणारे शंभूचरित्र सत्य इतिहासाच्या कसोटीवर उतरवून, या राजाच्या इतिहासावर चढविलेली दंतकथांची असत्य पुटे या नाटकातून आम्ही उतरून टाकली आहेत. शंभू राजांचे बालपण ते त्यांच्या मृत्युंजयापर्यंतचे चरित्र पहिल्यांदाच आम्ही रंगभूमीवर आणले आहे.दिग्दर्शक चव्हाण म्हणाले, नाटकाच्या प्रारंभाचा प्रयोग महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित साधून पहिल्या प्रयोगाचे आयोजन कले आहे. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजय पवार, ज्ञानेश महाराव, अॅड. शंकर निकम, राजेंद्र कोंढरे, अमरजा निंबाळकर, महेश जाधव, शरद भुताडिया, सत्यजित कदम, आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि बालकलाकार शंभूराजे निंबाळकर यांच्या हस्ते नाटकाच्या ध्वनी चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख कलाकार हर्षल सुर्वे, मंदार भणगे, महेश भूतकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)इतिसाह व नाट्य यांचा योग्य मिलाफकोल्हापुरातील स्थानिक ५० कलाकारांना घेऊन नाटक तयार करण्यात आले आहे. त्यांची निवड आॅडिशन घेऊन करण्यात आली असून ते नवीन आहेत. त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून सराव केला आहे. वेशभूषा, संगीत, प्रकाश योजना, गाणी, नेपथ्य, आदींबाबत मुंबई, पुण्यातील व्यावसायिक नाटकांच्या तोडीने तयारी केल्याचे दिग्दर्शक चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, यामध्ये इतिहास व नाट्य यांचा योग्य मिलाफ केला आहे. यामध्ये स्पेशल व्हिज्युअल लाईफ इफेक्टचा वापर केला आहे.
‘नरशार्दुल राजा संभाजी’ नाटकाचा आज प्रारंभ
By admin | Updated: November 28, 2015 00:15 IST