मुरगूड येथे मुख्य बाजारपेठेत राहणाऱ्या अमर गिरी यांच्या पत्नी व दोन मुलींना डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. अमर गिरी यांच्या पत्नी व दोन्ही मुलींना डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे. पत्नी व मोठी मुलगी निपाणी येथे तर लहान मुलगी मुरगूड येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. मुरगूड मधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर डेंग्यूने डोके वर काढल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. या घटनेची मुरगूड पालिका प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली असून नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी आरोग्य विभागास त्याबाबत सूचना दिल्या आहेत.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील म्हणाले, " गिरी यांच्या घराशेजारील सर्व परिसराचे सर्वेक्षण करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात, टेरेस, बाल्कनी, परसदारी, स्वच्छ पाण्याचा साठा करू नये. पावसाच्या स्वच्छ पाण्याने भरलेल्या रिकाम्या बाटल्या, डबे तसेच साठलेली डबकी, कचरा यांची निर्गत करावी. पाणी साठवण टाक्या स्वच्छ ठेवाव्यात. रोजच्या रोज पाणी वापरून आठवड्यातून किमान एकदा कोरडा दिवस पाळावा, डासांपासून सुरक्षित रहावे असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान पालिका प्रशासनाने तत्काळ शहरात सर्व्हे करावा तसेच आरोग्य विभागाने प्रामुख्याने स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.