कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीला अनेक दानशूर संस्था व व्यक्तींनी दान केलेल्या शेणी पावसात भिजू नयेत, याकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांकरवी त्या रविवारी सकाळी शनिवार पेठेतील खोलखंडोबा सभागृहात हलविण्यात आल्या. आजमितीला या स्मशानभूमीकडे तीन लाख शेणी व १,५०० टन लाकूडसाठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे. कोरोनाबाधितांचे मृतदेह दहन करण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमी राखीव ठेवण्यात आली आहे. दिवसाकाठी या स्मशानभूमीत ५० ते ६० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे स्मशानभूमीवरील ताण वाढत आहे. त्याकरिता लागणाऱ्या शेणी व लाकूड फाटाही कमी पडू लागला आहे. ही बाब जाणून कोल्हापुरातील दानशूर संस्था व व्यक्तींनी शेणी दान करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात महापालिकेवरील ताण हलका झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘तोक्ते”वादळामुळे राज्यभरात पाऊस पडत आहे. त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यालाही बसत आहे. त्यामुळे पचंगंगा स्मशानभूमीमध्ये बाहेर ठेवण्यात आलेल्या शेणी प्लास्टिक आच्छादनाने झाकून ठेवण्यात आल्या आहेत. तरीही दक्षता म्हणून महापालिका आरोग्य विभागाच्या ५०हून अधिक कामगारांनी रविवारी सकाळी ४ ट्रॅक्टरद्वारे येथील अतिरिक्त शेणीसाठा शनिवार पेठेतील खोलखंडोबा सभागृहात हलविला. त्यामुळे हा साठा पावसापासून सुरक्षित राहणार आहे.