कोल्हापूर : झोपडपट्टीतील सर्वसामान्य माणूस व अपार्टमेंटमधील उच्चभ्रू असेच येथील चित्र असणारा प्रभाग क्र. १५ कनाननगर हा मतदारसंघ होय. त्यामुळे तशी गरीब आणि श्रीमंत या मतदारांतच खरी लढत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या प्रभागात भाजप-ताराराणी महायुतीतर्फे सुनील मोदी, काँग्रेसतर्फे दिलीप पोवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधुकर काकडे, तर शिवसेनेकडून सागर घोरपडे हे तिघे निवडणूक लढवीत आहेत. याशिवाय चौघे अपक्षही निवडणूक रिंगणात पक्षाच्या उमेदवारांना टक्कर देत आहेत.कनाननगर हा प्रभाग सध्या ‘सर्वसाधारण’ साठी खुला झाला असल्याने इच्छुकांच्या येथे उड्या पडल्या आहे. त्यामुळे इथून शिवसेना वगळता सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी यापूर्वी महापालिकेवर प्रतिनिधित्व केले आहे. अशा या तिघा माजी नगरसेवकांत येथे खरी अटीतटीची लढत होणार आहे. याशिवाय शिवसेनेच्या सागर घोरपडे यांनीही या तिघा माजी नगरसेवकांना आव्हान निर्माण केले आहे. यापूर्वीचा कनाननगर व शाहूपुरी (उत्तर) या दोन प्रभागांचा काही भाग तोडून हा नव्याने प्रभाग क्र. १५ कनाननगर निर्माण केला आहे. त्यामुळे येथे जुन्याच नगरसेवकांत नव्याने लढती होणार असल्याचे चित्र आहे. या प्रभागात सुमारे ४९०० मतदार संख्या आहे. प्रभागाच्या एका बाजूला नागाळा पार्क दक्षिण बाजू, कनाननगर झोपडपट्टी व परिसर असा सुमारे २९०० मतांचा गठ्ठा असून, त्यामध्ये सुनील मोदी, दिलीप पोवार या दिग्गजांनी प्रचारात मुसंडी मारली आहे; तर वॉल्टर कट्टी, दौलत सावंत, रमेश कारंडे हेही अपक्ष मतदार नशीब अजमावत आहेत. स्टेशन रोडवरील घोरपडे गल्ली, ग्रीन पार्क, ट्रेड सेंटर असा सुमारे दोन हजार मतदारांचा गठ्ठा आहे. त्यामध्ये मधुकर काकडे, सागर घोरपडे व अपक्ष गणेश पाटील हे आपले नशीब अजमावत आहेत. जितके उमेदवार जास्त, तितकी मतांची विभागणी या गणितावरच उमेदवार आपले विजयाचे आराखडे मांडत आहेत.माजी नगरसेवकांची प्रतिष्ठा पणालाभाजप-ताराराणी महायुतीतर्फे रिंगणात उतरलेले व ‘चाणक्यनीती’साठी प्रसिद्ध असलेले सुुनील मोदी यांनी २००० आणि २००५ या दोन वेळा नगरसेवकपद भूषविले आहे; तर २०१० च्या निवडणुकीत त्यांची पत्नी कविता मोदी यांना पराभव पत्करावा लागला. मोदी यांनी यंदा होम टू होम प्रचारावर भर देत मतदारांना विश्वासात घेऊन जुन्या विकासकामांची आठवण करून देण्यावर भर दिला आहे. माजी नगरसेवक दिलीप पोवार यांनी १९९५ मध्ये नगरसेवकपद भूषविले आहे. त्यांच्या पत्नी सरस्वती पोवार या सध्या विद्यमान नगरसेविका असून, यापूर्वीही त्यांनी २००१ मध्येही प्रतिनिधित्व केले आहे. प्रभागाचे तीन वेळा प्रतिनिधित्व करताना केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा त्या निवडणुकीत मतदारांचा कौल घेत आहेत. स्टेशन रोड परिसरातील मतांच्या गठ्ठ्यावर माजी नगरसेवक मधुकर काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांनी, १९९० व २००० असे दोन वेळा नगरसेवकपद भूषविले आहे. त्यांनी, आपल्या कारकिर्दीत कनाननगर झोपडपट्टी घोषित केल्याचा दावा केला आहे. याशिवाय शिवसेनेच्या माध्यमातून सागर घोरपडे गेली १५ वर्षे समाजसेवेत सक्रिय आहेत. त्यांनीही प्रभागात नागरिकांसाठी केलेल्या कार्यावर ते निवडणुकीत उतरून त्यांनीही या माजी नगरसेवकांसमोर आव्हान उभे केले आहे.कनाननगर
तीन माजी नगरसेवकांत अटीतटीची लढत
By admin | Updated: October 19, 2015 00:26 IST