कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या दारात आंदोलनासह शहरबंदीचे हत्यार उपसावे लागले तरी चालेल. मात्र, शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून उग्र आंदोलनाची वज्रमूठ कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात आवळण्यात आली. लवकरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाव्य गावांतील नेत्यांची व्यापक बैठक घेऊ. राज्य शासन हद्दवाढीसाठी सकारात्मक असल्याने हद्दवाढीसाठी तीव्र आंदोलन करावे लागणार नाही, असे ठोस आश्वासन भाजपचे जिल्हा अध्यक्ष महेश जाधव यांनी दिले.कोल्हापूर शहराची गेली ४३ वर्षे रखडलेली हद्दवाढ व्हावी, यासाठी आंदोलनाची पुढील दिशा व शासनस्तरावरील पाठपुरावा यासाठी नियोजन करण्यासाठी कृती समितीचा पहिला मेळावा दसरा चौकातील राजर्षी शाहू मिनी सभागृहात झाला. मेळाव्यात नगरसेवक, महापालिकेचे पदाधिकारी व माजी महापौरांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील यांनी पालकमंत्री या नात्याने हद्दवाढीस विरोध करणाऱ्या गावांतील नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दादांनी हद्दवाढीस कधीही विरोध दर्शविलेला नाही. त्यांच्या वाक्यांचा विपर्यास केला जात आहे. मंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री व नगरविकास राज्यमंत्री यांची लवकच भेट घडवून आणू. हद्दवाढ करा, मगच निवडणूक घ्या. नगरपालिकेची टूम काढू नका. हद्दवाढ हाच मुद्दा शासनापुढे रेटू या, असा सल्ला कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी दिला. राजकीय पोळी भाजण्यासाठी कोल्हापूर शहरापासून दुरावा निर्माण करून शहरास बंदिस्त करण्याचा उद्योग बंद करा; अन्यथा शहराच्या वेशी तुम्हाला बंद होतील, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी दिला.हद्दवाढीचा संभाव्य विरोध झुगारून ती करण्याचा घटनात्मक अधिकार राज्य शासनास आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निकालांच्या आधारे विरोधास न जुमानता शासनाला हद्दवाढ करणे सहज शक्य आहे. यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अॅड. महादेवराव आडगुळे यांनी केले. मेळाव्यात निमंत्रक आर. के. पोवार यांनी प्रास्ताविक केले. अशोक पोवार यांनी आभार मानले. यावेळी स्थायी समितीचे सभापती आदिल फरास, नंदकुमार वळंजू, दिलीप पवार, बजरंग शेलार, अनिल घाटगे, अशोक भंडारी, सुरेश जरग, आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)मंगळवार पेठेतील डोकीटोलविरोधी कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांनी हद्दवाढ होणार नसेल, तर महापालिकेची नगरपालिका करा, असे पत्रक काढून मागणी केली. याला काही वक्त्यांनी पाठिंबा दिला, तर काहींनी तिचा खरपूस समाचार घेतला. तुमची मंगळवार पेठेतील डोकी चालवू नका. टोलविरोधी लढ्याचे रणशिंगही तुम्हीच फुंकले होते. आता हद्दवाढीचे रणशिंगही फुंका, असा टोला नंदकुमार वळंजू यांनी हाणला.कोण काय म्हणाले निमंत्रक आर. के पोवार : हद्दवाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे.अॅड. महादेवराव आडगुळे : ग्रामीण भागाचा शहरावर बोजा.प्रल्हाद चव्हाण : भाजपसाठी महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे.राजेश लाटकर : शहरात राहून हद्दवाढीस विरोध करणाऱ्या नेतृत्वाच्या दारात आंदोलन.मारुतराव कातवरे : हद्दवाढीनंतरच शहर परिसराचा विकास; मग नेत्यांची डोळेझाक का ?
हद्दवाढीसाठी शहरवासीयांची वज्रमूठ
By admin | Updated: June 22, 2015 00:47 IST