कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात विविध उपाययोजना करुन ही कोरोना संक्रमण कमी होताना दिसत नाही, उलट गेल्या दोन दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीनशेच्या पुढे गेली आहे. शहरातील १२ प्रभागात रुग्णांची संख्या ही ८० ते ९० च्या घरात पोहचली आहे.
शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळेच महापालिकेने जनता कर्फ्यू कडक करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरु केली आहे. गेल्या काही दिवसापासून शहरात २०० पेक्षा अधिक नव्याने रुग्ण आढळत होते, मंगळवारी व बुधवारी हा आकडे ३४० ते ३५८ पर्यंत पोहचला. त्यामुळे नवीन जेवढे रुग्ण आढळतील तेवढ्या कोरोना चाचणीची संख्या वाढते, आणि रुग्णांचीही संख्या वाढणार आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर नागरिकांनीच आता पुढे येण्याची आवश्यकता आहे.
शहरातील महानगरपालिकेचे प्रभाग असलेल्या मध्यवर्ती कळंबा कारागृह, आपटेनगर, सानेगुरुजी, फुलेवाडी रिंगरोड, रामानंदनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, पद्माराजे उद्यान, कैलासगडची स्वारी मंदिर, राजारामपुरी, खोलखंडोबा अशा प्रत्येक प्रभागात तर ६० पासून ९० पर्यंत रुग्ण आढळून आले आहेत. नवीन संक्रमणाच्या बाबतीत हे प्रभाग आघाडीवर आहेत.
शहरात सध्या २,८६१ कोरोना बाधित रुग्ण उपचाराखाली असून त्यापैकी ४९७ रुग्ण हे अन्य जिल्ह्यातील, अन्य राज्यातील आहेत.