कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुलसह जिल्ह्यातील विविध संस्थांतून बाहेर पडलेल्या निराधार, निराश्रित, अनाथ मुलांच्या मदतीसाठी समाजातून दोन दिवसांत शेकडो हात पुढे सरसावले. त्यातून तब्बल एक हजार क्विंटल धान्य जमा झाले असून, त्यातील किमान ५० मुला-मुलींना त्याचे बुधवारी वाटप करण्यात आले. संकुलाचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, विश्वस्त व्ही. बी. पाटील व पद्मा तिवले यांच्या हस्ते कीटचे वाटप झाले.
बालकल्याण संकुलसारख्या जिल्ह्यातील इतरही संस्थेतून बाहेर पडलेली सुमारे १८० हून अधिक मुले-मुली आहेत. त्यातील काही अजूनही शिकत आहेत, काही जुजबी कामे करून उदरनिर्वाह करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये सगळेच लॉक झाल्याने त्यांची उपासमार सुरू झाल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची समाजाने दखल घेऊन भरभरून मदत जमा होऊ लागली आहे. काहींनी लॉकडाऊन होणार म्हणून घरी आणून ठेवलेले धान्यही आणून दिले. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने कांदे-बटाटे प्रत्येकी शंभर किलो पोहोच केले. जमा झालेल्या मदतीतून संकुलातील कर्मचाऱ्यांनी धान्याचे कीट केले. यावेळी सनाथ वेल्फेअर फाउंडेशनच्या मनीषा शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मदतीसाठी पुढाकार
संस्थेचे विश्वस्त व्ही. बी. पाटील, माजी उपमहापौर संजय मोहिते, धान्य व्यापारी सुभाष चौगले, अशोकराव साळोखे, शिरीष सप्रे, राजू दोशी, शंकर सचदेव, नीळकंठ विश्वनाथ सावर्डेकर, दया बगरे, प्रसन्न घाणेकर, कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशन यांची मोलाची मदत झाली. काहीनी मदत केली. परंतु, नावेही सांगितलेली नाहीत.
कीट असे : गव्हाचे पीठ व तांदूळ - प्रत्येकी ५ किलो, साखर - २ किलो, तूरडाळ, मूग, कांदे, बटाटे - प्रत्येकी १ किलो. खाद्यतेल - १ लिटर
खर्चासाठी ५०० रुपये
याशिवाय मुलींना प्रत्येकी दोन सॅनिटरी पॅड देण्यात आल्या. महिनाभर खर्चासाठी काही रक्कम हाताशी असावी म्हणून प्रत्येकी ५०० रुपये देण्यासाठी काही दानशूर लोक पुढे आले.
चटणी-चहापूडची गरज
आता जमा झालेल्या मदतीमध्ये मुख्यत: धान्य जास्त आहे. त्याच्यासोबतच चटणी व चहापूडही द्यायची असल्याने या स्वरूपातील मदतही आवश्यक आहे.
१९०५२०२१-कोल-बालकल्याण संकुल मदत
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्थांतून बाहेर पडलेल्या अनाथ, निराधार मुलांच्या मदतीसाठी कोल्हापूरकर धावून आले. त्यातून जमा झालेले धान्य बुधवारी पहिल्या टप्प्यात ५० मुला-मुलींना वाटप करण्यात आले. (आदित्य वेल्हाळ)