कोल्हापूर : जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी अर्थात महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा इथं पाठवल्यामुळं आक्रमक झालेले नांदणी ग्रामस्थांसह सीमाभागातील हजारो नागरिकांचा जनसागर 'एक रविवार माधुरीसाठी' म्हणत रविवारी रस्त्यावर उतरला.
कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटक राज्यातील सीमा भागातील लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध संघटनांनी महादेवी हत्तीणला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर भगवान महावीर जयंती उत्सव समिती, कोल्हापूर येथील समस्त जैन आणि मुस्लिम बांधवांसह सर्व पक्षीय नागरिक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर या मूक पदयात्रेत सहभागी झाले. यामध्ये नांदणी मठाचे पदाधिकारी, शुक्रवार पेठ येथील जैन मठाचे भट्टारक स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महाराज, हुबळी येथील वरुर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन महाराज, श्रवण बेळगोळ येथील स्वस्तिश्री चारूकीर्ती महाराज सहभागी झाले आहेत.
पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी : पदयात्रेला रविवारी पहाटे नांदणीतून सुरुवात झाली. ही यात्रा सांगली-कोल्हापूर महामार्गानं खडी क्रशर, निम लशिरगाव फाटा, तमदलगे, मजले फाटा, हातकनंगले येथून चोकाकला आले. तेथे विश्रांती घेत शिरोली फाटा येथे पोहोचली. सायंकाळी ४ वाजता पुणे-बेंगळूरु महामार्गावरील तावडे हॉटेल येथून ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, बसंत बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचली. या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी ‘माधुरी परत करा’ आणि ‘जिओ बॉयकॉट’ असं लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या.
वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली : पदयात्रेदरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची अडचण टाळण्यासाठी प्रशासनानं कोल्हापूरचं प्रवेशद्वारावर असलेल्या तावडे हॉटेल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करत धैर्य प्रसाद हॉल मार्गे आदित्य कॉर्नर आणि जिल्हा परिषद नागोबा मंदिर या पर्यायी मार्गे पर्यायी मार्गानं वळवली.
मार्गावर खाद्य पदार्थ
पाणी, नाश्ता, जेवण, केळी, दूध, सरबत, राजिगरा लाडू, चिक्की, गूळ शेंगदाणे, बर्फी, चॉकलेट, बिस्कीट असे खाद्य पदार्थ स्टॉल लाऊन देण्यात येत होते.
माधुरी हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक धार्मिक कार्यात तिला महत्त्वाचं स्थान होतं. जिओवर बहिष्कार हे फक्त पहिलं पाऊल आहे. यापुढं रिलायन्स मॉलवर देखील आम्ही बहिष्कार टाकू. ज्या वनतारा केंद्रामध्ये हत्तीणला पाठवलय ते हत्ती केंद्रच बेकायदेशीर आहे. याबाबत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. माधुरीला परत आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही."- राजू शेट्टी, माजी खासदार