जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर रविवारी तिसरा खेटा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला. झुंजारराव सरनोबत यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली. सलग तीन रविवार भाविकांनी पायी चालत दर्शन घेतले. महाराष्ट्र बंदमुळे भाविकांच्या गर्दीवर काही प्रमाणात परिणाम झाला. मंदिराभोवती तीन-चार पदरी दर्शन रांगा लागल्या होत्या. कोडोली पोलीस ठाणे, अनिरुद्ध उपासना केंद्राचे स्वयंसेवक, देवस्थानचे कर्मचारी रांगेची व्यवस्था करीत होते. पोलिओ डोसही रविवारीच असल्यामुळे आरोग्य विभागाने मंदिरातही लहान बालकांना पोलिओ डोस देण्याची केंद्रे उभी केली होती. सकाळी ११ वाजता धुपारती व रात्री आठ वाजता श्रींचा पालखी सोहळा निघाला. रात्री ११ वाजता भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा व स्वच्छता यंत्रणा राबवली. चौथ्या खेट्याला एकादशी असल्याने अनेक भाविकांनी तिसऱ्या खेट्यालाच पुरण-पोळीचा नैवेद्य करून प्रसादाचा लाभ घेतला. झुंजारराव सरनोबत यांनी जोतिबा मंदिरात महाप्रसाद घातला. (वार्ताहर)
तिसरा खेटा धार्मिक वातावरणात पार
By admin | Updated: February 23, 2015 00:15 IST