एकनाथ पाटील --कोल्हापूर--काही कामचुकार पोलीस, ठाण्यांतील ‘दादा’, ‘भार्इं’ची ऊठबस, फिर्याद देण्यास येणाऱ्या नागरिकांना आवाज चढवून बोलणारे ठाणे अंमलदार, तर पोलीस कोठडीतील आरोपींना दिले जाणारे चमचमीत जेवण, हे चित्र बहुतांश पोलीस ठाण्यांत रोज पाहायला मिळते. या सर्व घडामोडींना चाप लावण्यासाठी आता पोलीस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक कार्यालयांसह सर्व पोलीस ठाण्यांत ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ‘क्राईम क्रिमीनल ट्रेकिंग अँड नेटवर्किंग सिस्टीम’ कार्यप्रणालीच्या माध्यमातून देशभरातील पोलीस ठाणी एकमेकांशी आॅनलाईनद्वारे जोडली गेली आहेत. त्यामुळे प्रत्येक गुन्ह्याची माहिती एका ‘क्लिक’वर दिसत आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी घेतला होता. त्याचा प्रारंभ शाहूपुरी पोलीस ठाण्यातून करण्यात आला आहे. ठाण्यातील कर्मचारी नेमके काय काम करतात? ते किती वेळ पोलीस ठाण्यात असतात? नागरिकांना कशा पद्धतीने वागणूक दिली जाते? या रोजच्या घडामोडी आता कॅमेराबद्ध होणार आहेत. यावर नजर ठेवून मुख्यालयातून डॉ. शर्मा प्रत्येक ठाण्यांचे कामकाज पाहणार आहेत. येथे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे कोल्हापूर शहर : शहर पोलीस उपअधीक्षक, शाहूवाडी पोलीस उपअधीक्षक, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा.इचलकरंजी शहर : अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक , शिवाजीनगर, गावभाग, शहापूर पोलीस ठाणे, जयसिंगपूर शहर. इतर : करवीर, गोकुळ शिरगाव, गांधीनगर, पन्हाळा, कोडोली, कागल, शाहूवाडी, शिरोळ, गगनबावडा, राधानगरी, नेसरी, गडहिंग्लज, चंदगड, हातकणंगले.प्रत्येक ठाण्यात सहा ते दहा कॅमेरे जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक कार्यालय ते पोलीस ठाणे, आदी ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सहा ते दहा कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलीस ठाण्याचे प्रवेशद्वार, ठाणे अंमलदार कक्ष, गोपनीय विभाग, कस्टडी, गुन्हे शाखा, आदी विभागांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक यांच्या कक्षात ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची कंट्रोल रूम असेल.आमदार फंडातून शहरातील शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयासह लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा व राजारामपुरी पोलीस ठाण्यात जे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, त्यासाठी लागणारा निधी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या आमदार फंडातून उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नियोजन केले जात आहे. तसेच करवीर पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना गृह विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पोलिसांवरही तिसऱ्या डोळ्याची नजर
By admin | Updated: November 30, 2015 01:08 IST