कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमधील शंभर रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत सकारात्मक विचार करा, अशी सूचना सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बॅँक कर्मचारी युनियनच्यावतीने दोन दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. त्यावेळी रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत चर्चा झाली. जिल्हा बॅँकेत गेली आठ-नऊ वर्षे शंभर रोजंदारी कर्मचारी काम करत आहेत. नोकरी मिळविताना त्यांना मोठी अग्निदिव्ये पार पाडावी लागली . त्यामुळे नोकरीही सोडता येईना आणि तुटपुंज्या पगारावर कामही करता येईना, अशी अवस्था या कर्मचाऱ्यांची झाली आहे. अडीच हजार पगारावर दोनवेळचे पोट भरणेही अवघड असल्याने या कर्मचाऱ्यांनी पगारवाढ करावी, अशी मागणी बॅँकेकडे केली होती; पण बॅँकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने युनियनच्या माध्यमातून त्यांनी सहकारमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. कर्मचाऱ्यांची व्यथा गोविंद पानसरे यांनी मंत्र्यापुढे मांडत कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये पगार करावा, अशी मागणी केली. यावर न्यायालयीन लढाईतही बॅँक सकारात्मक भूमिका घेईल, त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याबाबत बॅँकेने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना मंत्री पाटील यांनी बॅँकेला केली. यावेळी युनियनचे भगवान पाटील, परुळेकर, पी. एच. पाटील यांच्यासह बॅँकेचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘रोजंदारी’च्या पगाराबाबत सकारात्मक विचार करा
By admin | Updated: February 7, 2015 00:05 IST