कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात समविचारी पक्षांना सोबत घेऊन शिवसेना पॅनेल तयार करून कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंंकायचेच, असा निर्धार गुरुवारी दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या येथील निवासस्थानी झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी निर्धाराची माहिती दिली. ते म्हणाले, बाजार समितीमध्ये चुकीच्या पद्धतीने झालेल्या कारभारामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सक्षम पॅनेल तयार करून रिंगणात उतरणार आहे. समविचारी पक्षाच्या संपर्कात आहोत. माघारी दिवशी आमच्या पॅनेलचे उमदेवार जाहीर केले जातील. पॅनेलची रचना करताना सर्वांना सामावून घेताना एखादे पाऊल मागे घेण्याचीही आमची तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाजार समितीत सत्ता मिळवायची, असा निश्चय केला आहे. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, शिवसेनेचे सर्व आमदार, नेते हृदयापासून एकत्र आले आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहे. राज्यात सत्ता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार करून पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविणार आहे. सत्ताधाऱ्यांना वगळून जे-जे येतील त्या सर्वांना सोबत घेणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, बाजार समितीमध्ये सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार केला आहे. गडहिंग्लज व अन्य बाजार समितीच्या अखत्यारितील प्लॉट गायब केले आहेत. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी सुविधा नाही. त्यामुळे शिवसेना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहे. माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, इच्छुक अर्ज दाखल करीत आहेत. मात्र, पॅनेलमध्ये संधी न मिळणाऱ्या कार्यकर्त्यांस अर्ज मागे घेण्यास सांगितले जाईल. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यजित पाटील, तानाजी अंगिरे, हर्षल सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. माजी अध्यक्षांसह १४ अर्ज दाखल; दिवसात २०७ अर्जांची विक्रीकोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी गुरुवारी दोन माजी अध्यक्षांसह दहाजणांचे १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एका दिवसात तब्बल २०७ अर्जांची विक्री झाली आहे. एकूण ६०२ अर्जांची विक्री झाली आहे. यामुळे या निवडणुकीतही मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ८ जूनपर्यंत आहे. कृषी आणि विकास सेवा संस्था गटातून दिनकर पाटील (अर्जुनवाड), बाबासाहेब लाड (चरण), शशिकांत आडनाईक (यवलूज), रंगराव मोळे (घरपण), पृथ्वीराज खानविलकर (करंजफेण), संभाजी पाटील (कुडित्रे), विलास पाटील (वरणगे); तर इतर मागासर्गीय गटातून शशिकांत आडनाईक, भटक्या-विमुक्त जाती गटातून हंबीरराव कोळी (शिये), हमाल, तोलाई गटातून बाबूराव खोत (माळवाडी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील संभाजी पाटील व रंगराव मोळे बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहेत. बंद खोलीत चर्चा..मंडलिक यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असताना वार्तांकनासाठी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. बंद खोलीतील बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर बैठकीतील माहिती पत्रकारांना बोलावून दिली. मात्र, बैठकीस पत्रकारांना मज्जाव करण्याचा हेतू मात्र स्पष्ट झाला नाही.
समविचारींना सेना बरोबर घेणार
By admin | Updated: May 29, 2015 00:03 IST