कुरुंदवाड : शहरातील बायपास रस्त्याच्या मध्यभागी गेल्या अनेक वर्षांपासून असलेले विद्युत खांब आणि डीपी महावितरण कंपनीने हटविल्याने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रवासी आणि शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. महावितरणने चांगले काम केल्याने शहर शिवसेनेच्यावतीने येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सिकंदर मुल्ला, सहाय्यक अभियंता प्रियंका पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
शहरातून भैरववाडीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर घोरी कॉलनीजवळ गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या मध्यभागीच महावितरणने विद्युत खांब आणि डीपी उभारलेले होते. या खांबाला धडकून अनेकवेळा अपघातही झाले होते. शिवाय रस्त्याच्या मध्यभागी विद्युत खांब असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीस अडथळा ठरत होता. त्यामुळे शहर शिवसेनेने रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीकडे केली होती. मागणीची दखल घेतल्याने शिवसेनेच्यावतीने महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार केला.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख वैभव उगळे, वैशाली जुगळे, आप्पासो भोसले, राजू बेले, सुनील माळी, प्रशांत डवरी, ओंकार बाबर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.