नरेंद्र रानडे - सांगली .. वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गातील वन्यजीव नाहीसे होत चालले आहेत. असे असले तरीही केवळ सांगली महापालिका क्षेत्रात बारा प्रजातींच्या बेडकांचे वास्तव्य आहे. मात्र भरधाव वाहनांखाली सापडून पावसाळ्यातच सुमारे नऊशेहून अधिक बेडूक मृत्युमुखी पडत आहेत. येथील निनाद गोसावी या तरुण बेडूकतज्ज्ञाने याबाबत जनजागृती सुरू केली असून बेडूक संरक्षणासाठी सहयोगाकरिता त्याने सर्वांनाच हाक दिली आहे. येथील विलिंग्डन महाविद्यालयात बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या निनादने वेगळी वाट चोखाळत मागील पाच वर्षांपासून बेडकांचा अभ्यास सुरू केला आहे. उभयचर प्राणी असलेल्या बेडूक या प्रजातीसंबंधी फारशी माहिती उपलब्ध नसल्याने, प्रारंभी त्याच्यासमोर माहिती जमा करणे हेच मोठे आव्हान होते. यासाठी सोशल मीडियाचा उपयोग झाला. फेसबुकच्या माध्यमातून शोधमोहीम राबवून त्याने श्रीलंका, पाकिस्तान, चीन, फ्लोरिडा आदी देशांतील बेडूकतज्ज्ञांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून माहिती संकलित केली. कोल्हापूर येथील पर्यावरणतज्ज्ञ वरद गिरी यांचीही बहुमोल मदत झाली. एकदा माहिती मिळाल्यावर त्याने शहर परिसरात प्रामुख्याने पावसाळ्यात रोज रात्री भ्रमंतीला प्रारंभ केला. जगात बेडकांच्या एकूण ३४२ प्रजाती असल्या तरी, सांगली महापालिका क्षेत्रात बेडकांच्या बारा प्रजाती असल्याचे त्याला आढळले. वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्याचा फटका अप्रत्यक्षपणे बेडकांना बसत आहे. कीटक हे त्यांचे खाद्य. सकाळी बेडूक भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडतात, तर रात्री प्रजननासाठी त्यांची भ्रमंती सुरू असते. कित्येकवेळा रस्त्याच्या एका बाजूला पाणी साठलेले असते. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या दिशेने जाण्यासाठी बेडकांना रस्ता ओलांडावा लागतो. ती वेळ प्रामुख्याने सकाळची आणि रात्रीची असते आणि तेथेच त्यांचा भरधाव वाहनांखाली येऊन मृत्यू होतो. हे प्रमाण वाढत चालले आहे. निनादने महापालिका क्षेत्रातील बहुतांश रस्ते पालथे घातले आहेत. प्रत्येकवर्षी निनाद प्रसंगी एकटा किंवा काही सहकाऱ्यांसमवेत मुसळधार पाऊस सुरू असतानाही बेडूकप्रेमासाठी बाहेर पडतो आणि बेडकांचा अभ्यास करतो.
सांगलीत आहेत बारा प्रजातींचे बेडूक!
By admin | Updated: August 8, 2014 00:40 IST