संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूरच्या संस्थानने ख्रिश्चन मिशनरी वर्गाला शिक्षणप्रसारासाठी शहराबाहेर पूर्वेला थोडी जागा दिली. प्रचंड विरोधात रे. रॉयल गोल्ड वायल्डर यांनी तेथे प्रथम झोपडीतून काम सुरू केले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुढे वायल्डर मेमोरियल चर्च उभारले गेले. पण ५ एप्रिल १८५७ रोजी वायल्डर यांनी महापालिकेजवळ दगडी चर्च उभारले.अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी अमेरिकन प्रेस्बिटेरियन फॉरिन मिशन न्यूयॉर्क यांच्या प्रायाेजकत्वाखाली भारताच्या बहुतेक भागात मिशनरी आले. मिशनरींच्या खर्चनिधीची व्यवस्था त्यावेळी केली जात होती. तत्कालीन मुंबई इलाख्यात म्हणजे आताच्या महाराष्ट्रातील मर्यादित भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मिशनऱ्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी धर्मप्रसाराचे काम सुरू झाले. यामध्ये त्यांनी देखण्या चर्चची उभारणी केली.कॅथालिक आणि प्रोटेस्टंट असे ख्रिस्ती धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशनचे (ए. पी. मिशन) मिशनरी हे प्रोटेस्टंट होते. येथे येणारे मिशनरी तरुण, तडफदार, थिऑलॉजिकल कॉलेजचे पदवीधर, धर्मदीक्षित (म्हणजे रेव्हरंड पदधारक) होते. याशिवाय शिक्षणतज्ज्ञ, वैद्यकतज्ज्ञ असत. काहीजण सहपत्नीक, मुलाबाळांच्या कबिल्यासह आले. या मिशनरींची निवड करताना ए. पी. मिशनचा अधिकारी वर्ग उमेदवारास दक्षिण आशियातील भाषा अवगत असल्याची खात्री करत.भारतात येणाऱ्या प्रत्येक मिशनरी किमान एकतरी भारतीय भाषा शिकलेला असायचा. त्यांच्याकडे विविध भाषा शिकवण्याची व्यवस्था होती. महाराष्ट्रात जे जे मिशनरी आले त्यांचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. पुढे अहमदनगर (आताचे अहिल्यानगर), कोल्हापूर, पुणे हे जिल्हे आणि जिल्ह्यांतील शहरांमध्ये केंद्रे बनली. इसवी सन १८३६ मध्ये अहमदनगर येथे पहिले चर्च बांधले गेले. काही मिशनरींनी स्वकर्तृत्वावर येथील जमिनी मिळविल्या, त्यांना ए. पी. मिशनचे अर्थसाहाय्य मिळत गेले.
वायल्डर यांच्या सन्मानार्थ बांधलेले चर्चदगडी बांधकाम असलेले वायल्डर चर्च ही कोल्हापुरातील एक महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक आणि जुनी वास्तू आहे. या चर्चची स्थापना ५ एप्रिल १८५७ मध्ये अमेरिकन मिशनरी रेव्हरंड वायल्डर गोल्ड यांनी केली. महापालिकेच्या मागे असणाऱ्या चर्चसाठी तत्कालीन बाबासाहेब महाराज यांनी विशेष मदत केली आहे. या चर्चसाठी लागणारा दगड रंकाळ्याच्या खणीतून स्वतः रेव्हरंड वायल्डर गोल्ड यांनी खोदून आणला. त्यामुळे या चर्चला त्यांचेच नाव देण्यात आले. हे चर्च प्रोटेस्टंट पंथातील प्रेसबिटेरियन पंथाचे प्रतिनिधित्व करते.