संदीप आडनाईककोल्हापूर : बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्त्व लक्षात घेऊन कोल्हापुरात सुरू असलेल्या एकमेव ‘ह्युमन मिल्क बँकेचा’ नवीन वर्षात विस्तार होणार आहे. त्यासाठी सीपीआरच्या बालरोग विभागाने पुढाकार घेतला असून, या सुविधेमुळे गरजू बालकांना अमृततुल्यरूपी सकस दुधाची संजीवनी मिळण्यास मदत होणार आहे.नवजात अर्भक आणि बालकांच्या दृष्टीने आईचे दूध मधुर, कषाय रसात्मक, स्निग्ध, बलवर्धक, शीत गुणात्मक आणि डोळ्यांना हितकर आहे. त्यांच्यासाठी ते अमृतच असते. बाळाच्या पोषणासाठी मातृस्तन्य अत्यंत हितकारी असते. अतिशय स्वच्छ, जंतुरहित हे स्तन्य असते. आईचे दूध पचण्यास हलके आणि बहुहितकारी असते. शहरातही अनेकदा गंभीर स्वरूपाच्या प्रसूती शस्त्रक्रिया होतात. तेव्हा नवजात बाळाला काचेच्या पेटीत ठेवले जाते. आईची प्रकृतीदेखील अस्वस्थ असते. त्यावेळी या बँकेच्या स्वरूपात मातेचे दूध बाळाला उपलब्ध करून देणे शक्य आहे. कोल्हापूर शहराशिवाय इतरत्र ही सोय नसल्याने पावडरचे दूध बाळाला द्यावे लागते.स्टोअरेजशिवाय आठ ते दहा तास सुरक्षितसध्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातच हे आईचे दूध साठवून ठेवणारी बँक आहे. सध्या या बँकेतून ६०० एमएल दूध जमा होते, जे फक्त या रुग्णालयातील बाळांनाच पुरते. उणे १४ अंश तापमानात तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ मातेचे दूध सुरक्षितरीत्या साठवून ठेवता येते. पाश्चराइज केलेले हे दूध स्टोअरेजशिवाय आठ ते दहा तास सुरक्षित राहते. या बँकेत मिल्क साठवण्याच्या मशीनची किंमत १५ लाखांपेक्षा अधिक आहे.
केवळ कोल्हापुरातच मिल्क बँक असल्यामुळे शेजारच्या जिल्ह्यांतूनही याला मागणी आहे; परंतु इतर ठिकाणांहून स्तनदा माता या बँकेत दूध देऊ लागल्या, तर इतर जिल्ह्यांतील बालकांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे इतरांनीही यासाठी आपले योगदान द्यावे. - डॉ. शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआरमातेच्या दुधामुळे बाळाच्या आतड्यांची, शरीराची व मेंदूची योग्य वाढ होण्यास मदत होणार आहे, तसेच बाळ व मातेच्या प्रकृतीसाठी ही बँक वरदान आहे. - डॉ. भूषण मिरजे, बालरोगतज्ञ, सीपीआरह्युमन मिल्क बँकेच्या विस्तारामुळे शेजारील जिल्ह्यांतील नवजात अर्भक आणि बालकांनाही मातेचे अंगावरील दूध मिळण्यास मदत होईल. त्यामुळे नैसर्गिक संगोपनास मदत होणार आहे. - डॉ. संगीता कुंभोजकर, विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर