कोल्हापूर : जंगलात वाढणाऱ्या विविध रानकंदमुळांची ओळख, त्यांचा आहारातील वापर याची माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करावी या हेतूने उद्या, शनिवार, दि. २० आणि रविवार, दि. २१ जानेवारी रोजी ७० हून अधिक कंदमुळांचे राज्यातील दुसरे तसेच १६० हून अधिक औषधी वनस्पतींचे राज्यातील पहिलेच प्रदर्शन कोल्हापुरात दसरा चौकातील शहाजी कॉलेज येथे भरवण्यात आले आहे.ही माहिती एनजीओ कॅम्पेशन २४, कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर आणि उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक वाली यांनी विविध कंद आणि औषधी वनस्पतींची माहिती दिली.निसर्गअंकुर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कॅम्पेशन २४ ह्या संस्थेने, शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब कोल्हापूर, यूथ अॅनेक्स, इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनिअल्स, रोटरॅक्ट- कोल्हापूर झोन ह्या संस्थांच्या सहकार्याने भरणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता शहाजी कॉलेज येथे खासदार धनंजय महाडिक, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे उपस्थित राहणार आहेत.या प्रदर्शनात काही कंद विक्रीसाठी तसेच विविध कंदांच्या पाककृतीही दिली जाणार आहे. कंदांपासून तयार केलेल्या पदार्थाची चवही येथे चाखता येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे. यावेळी प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्क्ळकी, कोचेअरमन अमृता वासुदेवन, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, मंजिरी कपडेकर, सुशील रायगांधी, अभिजित पाटील, आरती रायगांधी उपस्थित होते.
औषधी वनस्पतींचे राज्यातील पहिलेच प्रदर्शन कोल्हापुरात, कंदमुळेही पाहता येणार
By संदीप आडनाईक | Updated: January 18, 2024 18:04 IST