कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात काेविड प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला असल्याने जिल्ह्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा शिल्लक आहे. अखेर सांगली जिल्ह्यातून बुधवारी सायंकाळी पाच हजार डोस मागवण्यात आले; परंतु येत्या दोन दिवसात पुरेसे डोस उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले.
जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून काेविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला लसीकरणाचे प्रमाण कमी होते; मात्र आता ते वाढू लागल्यामुळे जादा डोसची गरज भासत आहे. बुधवारअखेरचा आढावा घेता गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस लस पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे मग ऐनवेळी धावपळ नको म्हणून बुधवारीच सायंकाळी सांगली जिल्ह्यातून पाच हजार डोस मागवण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवातीपासून कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात येत आहेत; मात्र आता यापुढच्या काळात कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यांना पहिला कोविशिल्डचा डोस दिला आहे त्यांना कोविशिल्डचाच दुसरा डोस देणे बंधनकारक असल्यामुळे कोविशिल्डच्या ४३५७४ डोसची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. पुढील दहा दिवसांसाठी एवढा साठा आवश्यक आहे.
उद्या, गुरुवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोविशिल्डऐवजी कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात रोज सुमारे १५ हजार लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येते. त्यानुसार पुढील दहा दिवसांसाठी दीड लाख कोव्हॅक्सिनचे डोस अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे नोंदवण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वत:सह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केल्याने लसीकरणाचा आकडा वाढायला सुरुवात झाली आहे.
चौकट
तारीख आलेले डोस
१३ जानेवारी २१ ३७,५८०
२५ जानेवारी २१ ३१,५००
२२ फेब्रुवारी २१ २५,८००
२ मार्च २१ ४०,५००
१० मार्च २१ ५१,०००
१२ मार्च २१ १३,०००
१५ मार्च २१ ५०००
एकूण २ लाख ४ हजार ३८०
एकूण वितरण २ लाख ५१०
एकूण शिल्लक ३८७०