सांगली : जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याने बेकायदेशीररित्या, गरज नसताना स्टार्टर, प्रीव्हेन्टर आदी दहा लाखांच्या साहित्याची खरेदी करून गोलमाल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यास त्वरित निलंबित करून, या खरेदीची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत केली.ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील १५४ छोट्या पाणी योजना असून तेथील विद्युत मोटारींसाठी स्टार्टर खरेदीसाठी २००८-०९ मध्ये दर करारपत्रक (आरसी) मंजूर केले आहे. ही आरसी शासनाची नसून जिल्हास्तरावर मंजूर केलेली आहे. यास कायदेशीरदृष्ट्या एक वर्षच अधिकार आहे. परंतु, या आरसीला कोणतीही मुदतवाढ न घेता आजपर्यंत पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून साहित्याची खरेदी सुरु आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक लाखापेक्षा जादा साहित्य खरेदी करायचे असेल, तर त्याची आॅनलाईन निविदा काढण्याची गरज होती. तेही केले नसून, जुन्या आरसीवरच स्टार्टर, प्रीव्हेन्टर प्रत्येकी शंभर यासह अन्य साहित्याची दहा लाख ७८ हजारांची खरेदी केली आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात साहित्याची खरेदी करताना शासननियमाप्रमाणे अर्थ समिती, स्थायी समितीची मंजुरी घेतली नाही. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या साहित्य खरेदीची कल्पना दिली नाही. तसेच साहित्य खरेदीचा आदेश जिल्हास्तरावरून दिला असून सर्व साहित्य मात्र जत पंचायत समिती येथे उतरले आहे. या सर्व साहित्याचा धनादेश काढण्याची सूचनाही जत गटविकास अधिकाऱ्यांना दिली आहे. या आदेशात मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य वित्त अधिकारी यांच्या सूचनेनुसार हा धनादेश काढण्याचे पत्र संबंधित अधिकाऱ्याने गटविकास अधिकाऱ्यांना पाठविले आहे. परंतु, प्रत्यक्षात सीईओंनी व वित्त अधिकाऱ्यांनी असे आदेश दिले नसल्याचे सांगितले आहे. पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही साहित्य खरेदीबद्दल कल्पना नसल्याचे दिसत आहे. असे असेल तर साहित्याची बेकायदेशीर खरेदी करून लाखो रूपयांची उधळण करणाऱ्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही नाईक यांनी केली आहे. (वार्ताहर)
पाणी पुरवठ्यात दहा लाखांचा गोलमाल
By admin | Updated: March 14, 2015 00:19 IST