लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसह कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालकांच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून सुरू केले.येथील राजाराम महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ‘सुटा’ने आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी ‘सर्व शिक्षकांना आॅनलाईन पद्धतीने वेतन मिळालेच पाहिजे’, ‘ सहसंचालक डॉ. अजय साळी यांच्या गैरकारभाराची सर्वंकष चौकशी झालीच पाहिजे’, आदी स्वरुपातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रा. डॉ. विजया पिंजारी, एस. एम. मेस्त्री, डी. जे. ओवाळे, बी. एम. संकपाळ आणि एन. जी. वाले यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. आंदोलनात ‘सुटा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. एच. पाटील, उपाध्यक्ष प्रा. एस. एम. पवार, यु. ए. वाघमारे, आर. डी. ढमकले, डी. जे. साळुंखे, सहकार्यवाह प्रा. आर. जी. कोरबू, कार्यालय कार्यवाह प्रा. प्रकाश कुंभार, ज्येष्ठ सल्लागार सुधाकर मानकर, आदी सहभागी झाले. दरम्यान, ‘सुटा’ने विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. १ मे, २९ मे आणि दि. ३ जुलैला शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलने केली तरीही संबंधित प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे सोमवारपासून (दि. १०) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनातील पुढील टप्पा म्हणून बुधवारी (दि. १२) शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. गुरुवारी घंटानाद, तर शुक्रवारी ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती असल्याची माहिती ‘सुटा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. एच. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.कामकाजावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही : अजय साळीदरम्यान, या आंदोलनाबाबत कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘सुटा’ ने ज्या-ज्या मागण्या, विषय मांडले आहेत. त्याबाबतचे लेखी स्पष्टीकरण सुटा आणि संबंधित महाविद्यालयांना लेखी स्वरुपात दिले आहे. त्यामुळे माझ्या आणि कार्यालयाच्या कामकाजावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच येत नाही. कार्यालयातील कामकाज स्पष्ट आहे. आम्ही लेखी स्पष्टीकरण दिले असल्याने ‘सुटा’च्या मागण्या नियमबाह्ण असल्याची भूमिका माझ्या कार्यालयाची आहे.
शिक्षकांना आॅनलाईन पद्धतीने वेतन मिळावे
By admin | Updated: July 11, 2017 00:45 IST