शरद जाधव - भिलवडी ,, राज्य सरकारच्या ताठर भूमिकेमुळे तासगाव-पलूस तालुका सहकारी साखर कारखाना आगामी गळीत हंगामामध्ये सुरू होण्याची चिन्हे नाहीत. मात्र खा. संजय पाटील यांच्या गणपती जिल्हा संघाने पुढाकार घेऊन कारखान्याचा विक्री व्यवहार रद्द करण्याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्यास हा प्रश्न सहज सुटणे शक्य आहे.गृहमंत्री, वनमंत्री, सहकारमंत्री व मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलून राज्य सहकारी बँकेने एक वर्षाच्या कालावधीसाठी निविदा काढल्याने हा कारखाना चालवावयास घेण्याचा धोका स्वीकारण्यास कोणतीच संस्था अगर सहकारी साखर कारखाना तयार नाही. कारखाना सुरू न झाल्यास पलूस तासगाव तालुक्यातील हजारो टन उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रत्येक नेत्याने सोयीच्या राजकारणानुसार वारंवार भूमिका बदललल्या. तासगाव कारखानाप्रश्नी, गणपती संघाशी झालेला विक्री व्यवहार रद्द करण्याबाबत कारखाना बचाव समिती, कामगार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, डॉ. पतंगराव कदम समर्थक व आर. आर. पाटील समर्थकांनी संघाचे अध्यक्ष खा. संजय (काका) पाटील यांच्या विरोधात मोठी मोहीम हाती घेतली. मात्र लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान खा. संजय पाटील यांनी कारखान्यासंदर्भात गृहमंत्री व वनमंत्र्यांबरोबर एकाच व्यासपीठावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली. यानंतर पलूस, तासगाव निवडणुकीत तालुक्यातील ऊस उत्पादक कामगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वांनी संजयकाकांना सहकार्य केले. आता संजयकाकांनी हा पैरा फेडण्याची संधी चालून आलेली आहे. कारखान्याची विक्री प्रक्रिया रद्दच होणार आहे, हे वास्तव आहे. विक्री प्रक्रियेबाबत डी. आर. टी. न्यायालयात राज्य बँक विरोधी अवसायक मंडळ असा दावा सुरू आहे. उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकाही दाखल आहेत. या दाव्यांचा निकाल, त्यावर उभय पक्षाकडून दाखल होणारे अपील या बाबींसाठी किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. याचिकेचे कारण पुढे करून राज्य बँक फक्त एक वर्षासाठी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढत आहे. गुंतविलेले भांडवल एका वर्षात परत मिळण्याची गॅरंटी नाही व पुढील वर्षी कारखाना भाडेतत्त्वावर न मिळाल्यास बसविलेल्या मशिनरी व गुंतविलेले कोट्यवधी रुपये पाण्यातच बुडणार आहेत.
‘तासगाव’चा चेंडू काकांच्याच कोर्टात
By admin | Updated: August 7, 2014 00:20 IST