कोपार्डे : आडूर (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीला कार्यालयच नाही. ग्रामपंचायत स्थापनेपासून कार्यालय तलाठी सज्जात आहे. तेही आता मोडकळीस आले असून, कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ग्रामपंचायतीसाठी जागा मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवूनही तो मंजूर झाला नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयासाठी इमारत कधी मिळणार, अशी चर्चा सुरू आहे.
आडूर गावची ग्रामपंचायत आडूर, कळंबे व भामटे, अशी ग्रुप ग्रामपंचायत होती. यानंतर लोकसंख्या वाढीबरोबर स्वतंत्र ग्रामपंचायतीचे निकष पूर्ण केल्यानंतर १९७० ला प्रथम भामटे व त्यानंतर कळंबेतर्फे कळे या गावच्या स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. आडूर गावची ग्रामपंचायत पूर्वी ज्या तलाठी कार्यालयात भरत होती, तेथेच आजही आहे. ही इमारत आता मोडकळीस आली आहे, कोणत्याही वेळी कोसळण्याच्या परिस्थितीत आहे.
शासनाने ग्रामपंचायतीकडे दरवर्षी थेट वित्त आयोगाचा निधी दिला जातो. त्याशिवाय गावचा कारभार ऑनलाइन करण्यासाठी यंत्रणाही पुरवली आहे. अशा वेळी ग्रामपंचायतीला गेल्या ५० वर्षांत स्वतंत्र इमारत उभी करता आलेली नाही. करवीर तालुक्यातील अनेक गावांत लोकवर्गणी, शासकीय व राजकीय निधी आणून टोलेजंग व काॅर्पोरेट ग्रामपंचायत इमारती बांधण्यात आल्या आहेत; पण आडूर गावातील गावकारभाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले असते, तर मोडक्या कार्यालयात बसून कारभार करण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
चौकट
ग्रामपंचायत कार्यालयाला जागा मिळेना -- गावाला ४२ एकर गायरान आहे. गायरानातील जागा कार्यालयासाठी मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला; पण तो नाकारला आहे. गायरानाची राखण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे. मग कार्यालयासाठीसुद्धा ग्रामपंचायतीच्या गायरानमधील जागा दिली जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
फोटो
आडूर, ता. करवीर येथे तलाठी सज्जात मोडकळीस आलेल्या इमारतीचे ग्रामपंचायत कार्यालय.