कोल्हापूर : हत्यार परवाना नूतनीकरणासाठी शासन नियमानुसार ठरलेली रक्कमच परवानाधारकांकडून स्वीकारून याबाबतची कार्यवाही करा, असे आदेश आज, गुरुवारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी करवीर प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांना दिले.जिल्ह्यातील सहापैकी पाच प्रांत कार्यालयांमध्ये वार्षिक परवाना नूतनीकरणासाठी ६० रुपयेच घेतले जातात; परंतु करवीर प्रांत कार्यालय मात्र लोकांना स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेत चलन भरायला पाठवून देते. तिथे किमान तीनशे रुपयांच्या आतील चलन भरून घेतले जात नाही. त्यामुळे ज्या कामाचे सरकारी शुल्क ६० रुपये आहे, त्याच कामासाठी विनाकारणच लोकांना ३०० रुपये भरावे लागत आहेत. याबाबत काही लोकांनी ‘लोकमत’ हेल्पलाईनकडे तक्रार केली होती. त्यावर आज जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी याबाबत शासन नियमानुसारच हत्यार परवान्यासाठीची रक्कम स्वीकारली पाहिजे. परवानाधारकांची गैरसोय होऊ नये हीच प्रशासनाची भूमिका आहे; त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने कार्यवाही करावी, असे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.करवीर प्रांत कार्यालयाच्या कार्यकक्षेत कोल्हापूर शहर, करवीर व गगनबावडा तालुका येत असल्याने परवानाधारकांची संख्या जास्त आहे. त्यांचे प्रत्येकी २४० रुपये जास्त जात आहेत. परवाना नूतनीकरणाचे काम यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होत होते. बंदूक, रायफलची त्रैवार्षिक नूतनीकरण फी ९० रुपये, तर पिस्तूल-रायफलची वार्षिक नूतनीकरण फी ६० रुपये आहे. परवाना नूतनीकरण करण्यासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागतात. ते मारावे लागू नयेत म्हणून या कामाचे विकेंद्रीकरण करून शासनाने हे अधिकार प्रांत कार्यालयांना दिले. लोकांना त्रास नको म्हणून जे काम दिले, त्याच कामात जास्तच त्रास कसा होईल,असा करवीर प्रांत कार्यालयाचा व्यवहार असल्याने लोकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
परवाना फी नियमानुसार घ्या
By admin | Updated: January 9, 2015 00:06 IST