लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आई-वडिलांचा सांभाळ दैवत मानून करा. प्रामाणिकपणाने त्यांची सेवा करा, त्यांना कधीही अंतर देऊ नका, लोभापासून दूर राहून लोकांची सेवा करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोमवारी शासकीय विश्रामगृहात अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अनुकंपाचे १२२ प्रस्ताव आले होते, त्यातील ५० जणांची नियुक्ती केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात विविध शासकीय विभागांत २५ टक्के पदे रिक्त असताना गाडा चालवणे कठीण आहे. मनुष्यबळाअभावी लोकांची कामे होत नसल्याने १२ हजार पोलिसांसह १० लाख पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने भरती प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे किमान अनुकंपाची तत्काळ भरती करण्याची मोहीम हातात घेतली.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, घरातील कमवता माणूस गेल्याने त्या कुटुंबाला तत्काळ आधाराची गरज असते. मात्र, किचकट नियमांमुळे अनुकंपा भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होत नाही. त्यामुळे संबंधितांना त्याचा त्रास सहन करावा लागतो, यासाठी या प्रक्रियेत सुटसुटीतपणा व शिथीलता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनिषा देसाई आदी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव यांनी आभार मानले.
हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन
अनुकंपाखालील भरती प्रक्रिया लवकर करण्याचा शासनाने फेबु्वारीत निर्णय घेतला आणि ग्रामविकास विभागाने तत्काळ अंमलबजावणी केली. यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे योगदान असून त्यांचे अभिनंदन करतो, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
मुश्रीफ यांना काढला मित्तल यांचा चिमटा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी अनुकंपाचे काम गतीने केल्याबद्धल काैतुक करत, ते सगळीच कामे गतीने करतात असे नाही, असा चिमटा मंत्री मुश्रीफ यांनी काढला.
फोटो ओळी : जिल्हा परिषदेच्या अनुकंपा कर्मचाऱ्यांना सोमवारी नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी डॉ. पद्माराणी पाटील, बजरंग पाटील, ए. वाय. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सतीश पाटील, स्वाती सासने, अमन मित्तल उपस्थित होते. (फोटो-०७१२२०२०-कोल-झेडपी)
- राजाराम लोंढे