कोल्हापूर : ग्राहक हा केंद्रबिंदू असून, त्यांना मिळणारी सबसिडी बुडू नये यासाठी गॅस वितरकांना सूचना दिल्या आहेत, तसेच लवकरच वितरकांची बैठक घेऊन याचा आढावा घेऊ, असे इंडियन आॅईल कॉर्पोरेशन (इण्डेन)चे विक्री अधिकारी एन. पी. आमरसकर यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘मोबाईल गॅस बुकिंगने सबसिडी बुडण्याची भीती’ या मथळ्याखाली रविवारी वृत्त दिले होते. गॅस सिलिंडर मोबाईलवरून बुकिंग करताना आता सबसिडी नाकारण्यासाठी ‘शून्य’ व पाहिजे असल्याचे ‘एक’ असे नवीन दोन सुधारित पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. ते निवडताना चुकून आकड्यांची अदलाबदल झाल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. याचे वास्तव्य ‘लोकमत’ने मांडले होते. याबाबत आमरसकर म्हणाले, अशा स्वरुपाच्या तक्रारी सांगलीमधूनही आपल्यापर्यंत आल्या आहेत. ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही. चुकून ग्राहकांकडून सबसिडी बंद होण्याचे बटण दाबले गेले तरी त्यासंदर्भात प्रथमत: वितरक व ग्राहकांकडून खातरजमा करून घेऊ. विनाकारण गरजू व्यक्तीची सबसिडी बंद करून त्याच्यावर अन्याय केला जाणार नाही.(प्रतिनिधी)
गॅस सबसिडी न बुडण्याची दक्षता घेऊ : आमरसकर
By admin | Updated: July 21, 2015 01:00 IST