शिरोली : शिरोलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना होम क्वॉरंटाइन न करता गावात अलगीकरण कक्षात ठेवा, अँटिजन चाचणीसाठी जे नागरिक सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिले.
शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे होते. शिरोलीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून, ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले आहे. मात्र, हेच रुग्ण घरी न थांबता बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तहसीलदार उबाळे यांनी ग्रामपंचायतीने अलगीकरण कक्ष सुरू करून कोरोना रुग्णांना तिथे ठेवण्याच्या सूचना केल्या. कोरोना रुग्णाच्या कुटुंबाची अँटिजन चाचणी करा, जे या चाचणीला सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना उबाळे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी किरण भोसले यांना दिल्या.
चौकट : स्वॅबचे रिपोर्ट लवकर द्या
गावातील प्राथमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका, मदतनीस त्यांना नेमून दिलेल्या कामामध्ये हयगय करत असतील, तर त्यांचे वेतन थांबवण्यासंदर्भातील पत्र संबंधित विभागाला द्या, असा इशाराही उबाळे यांनी दिला. यावेळी उपसरपंच सुरेश यादव यांनी कोरोना स्वॅबचे रिपोर्ट लवकर मिळावेत, अशी मागणी केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी व्ही.बी. भोगण, आरोग्य अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्यूज, मंडल अधिकारी भरत जाधव, तलाठी नीलेश चौगुले उपस्थित होते.
फोटो : १९ शिरोली आढावा बैठक
शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे, सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ जेसिका अँड्र्यूज यांची उपस्थिती होती.