कोल्हापूर : पर्ल्स ग्रीन फॉरेस्ट लि., (पल्स) कंपनीच्या एजंटांकडून पत्रकारांना धमकी देण्यात आली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई, तसेच या प्रकरणात पत्रकारांची मानहानी करणाऱ्या पोलीस प्रशासनाला कडक समज द्यावी, या मागणीचे निवेदन आज, सोमवारी ‘कोल्हापूर प्रेस क्लब’तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना देण्यात आले.शुक्रवारी शाहूपुरी येथील पर्ल्स ग्रीन फॉरेस्ट लिमिटेड या गुंतवणूक कंपनीच्या कार्यालयामध्ये शिवसेनेतर्फेे आंदोलन करण्यात आले. त्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार सुखदेव गिरी, बाळासाहेब पाटोळे, अमोल माळी यांना तेथे उपस्थित असणाऱ्या काही पर्ल्सच्या एजंटांनी शिवीगाळ केली. यानंतर हे सर्व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात आले. त्याठिकाणी संबंधित एजंटांनी थेट या पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. त्याचप्रकारे पत्रकारांवर गदा आणणारा आहे. हा प्रकार सुरू असताना शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांना वारंवार विनंती करूनही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संशयित आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. या संशयित आरोपींना समज देण्याऐवजी पत्रकारांनाच अवमानकारक वागणूक दिली. हा प्रकार निंदणीय असून, यासाठी पोलीस निरीक्षक जाधव यांच्यावर कारवाई करावी, तसेच पोलीस प्रशासनालाही कडक समज द्यावी. त्याचबरोबर गुन्हा नोंद झालेल्या एजंटांवर योग्य व तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.यावर निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करून जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना कळवू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.शिष्टमंडळात अध्यक्ष अनिल देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब कोळेकर, नंदकुमार ओतारी, भारत चव्हाण, नंदकुमार वेठे, दत्तात्रय बोरगे, सुखदेव गिरी, समीर देशपांडे, समीर मुजावर, दीपक घाटगे, बाबूराव रानगे, अमरसिंह पाटील, एकनाथ पाटील, बाळासाहेब पाटोळे, प्रवीण देसाई, शीतल धनवडे, इक्बाल रेठरेकर, बाजीराव फराकटे, पांडुरंग पाटील, मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे, आदींसह पत्रकार, छायाचित्रकार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘पर्ल्स’च्या एजंटांवर कारवाई करा
By admin | Updated: November 11, 2014 00:01 IST