कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील अतिरिक्त मुख्याध्यापकांच्या पदावनतीस मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २१० मुख्याध्यापकांना १७ जुलैपर्यंत दिलासा मिळाला असून पदवीधरांचे समायोजन मात्र उद्या, शनिवारपासून सुरू राहणार आहेत. सप्टेंबर २०१३ च्या पटनिश्चितीनुसार जिल्हा परिषदेकडील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, पदवीधर व अध्यापक ही पदे अतिरिक्त झाली होती. त्यानुसार त्यांच्या समायोजनेची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात २१० मुख्याध्यापक अतिरिक्त होत आहेत. आतापर्यंत १०७ मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले आहे. उर्वरित १०३ मुख्याध्यापकांचे समायोजनाची प्रक्रिया सुरू केली जाणार होती. तोपर्यंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासह काही मुख्याध्यापकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आरटीई निकषांनुसार इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग न जोडता विद्यार्थी पट निश्चिती केली आहे. हे वर्ग न जोडल्याने मुख्याध्यापक पदे अतिरिक्त होत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मुख्याध्यापकांना पदावनत करण्याची प्रक्रिया चुकीची आहे, ती रद्द करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने याचिकेत केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होऊन १७ जुलैपर्यंत स्थगिती दिली.
मुख्याध्यापक पदावनतीस स्थगिती
By admin | Updated: July 5, 2014 01:01 IST