पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणाला बळ देण्याचा गवगवा प्रशासनाकडून केला जात असला तरी दुसरीकडे विद्यार्थ्यांसह सहाय्यक प्राध्यापकही बोगस दाखवून बीडशेड (ता. करवीर) येथील सूर्यकांत सदाशिव दिंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने कागदावरच महाविद्यालय दाखवण्याचा प्रताप केला आहे.विविध विषयांसाठी या महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाकडून १८ जणांची पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापक म्हणून मान्यता घेतली आहे. विशेष म्हणजे यातील दहाहून अधिक जणांना आपण संबंधित महाविद्यालयात प्राध्यापक आहोत याचीच कल्पना नाही. हे सर्वजण बँकेत, पतसंस्थेत, पुण्यात नोकरीस आहेत. संबंधित व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून या महाविद्यालयाने केलेल्या प्रतापाने कागदावर प्राध्यापक बनलेले हादरले आहेत. विद्यापीठानेही प्रस्तावाची पडताळणी न करताच मान्यता दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.बहिरेश्वर (ता. करवीर) येथील ज्ञान विज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गणेशवाडी- बीडशेड येथे विनाअनुदानित तत्त्वावर सूर्यकांत दिंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. या संस्थेने २०२४-२५ या वर्षात १८ जणांची पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची मान्यता विद्यापीठाकडून घेतली आहे. मात्र, यातील दहाहून अधिक प्राध्यापकांना आपण या संस्थेत प्राध्यापक आहोत हे माहितीच नाही. कोताेली (ता. पन्हाळा) येथील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शाळेतील शिक्षक सागर कांबळे यांच्या शैक्षणिक कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांनाही या महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून दाखवण्यात आले. ही गोष्ट कांबळे यांना समजल्याने त्यांनी विद्यापीठाशी पत्रव्यवहार केल्यानंतर या महाविद्यालयाची बनवेगिरी उघडकीस आली.
कागदपत्रे महाविद्यालयाकडे गेलीच कशी?दिंडे महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक दाखवलेल्या कांबळे यांच्यासह जवळपास दहा जणांचा या महाविद्यालयाशी काडीमात्र संबंध नाही. त्यांनी या महाविद्यालयात कधी मुलाखत दिलेली नाही. त्यांना ते कुठे आहे याची माहितीही नाही. मात्र, तरीही आमची कागदपत्रे या महाविद्यालयांकडे गेलीच कशी, असा सवाल या मंडळींनी केला आहे. कांबळे यांनी एका लिपिकाकडे शैक्षणिक अर्ज भरण्यासाठी व्हॉट्सॲपवर कागदपत्रे पाठवली होती. त्या लिपिकानेच या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आक्षेप आहे.
मी तर गृहिणी, प्राध्यापक झालीच कशी?पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील एक महिला मानसशास्त्राची पदव्युत्तर आहे. मात्र, ती सध्या गृहिणी म्हणूनच भूमिका निभावते. महाविद्यालयाने तिलाही पूर्णवेळ प्राध्यापक बनवले आहे. हे कॉलेज मी कधी पाहिलेले नाही, कधी मुलाखत दिलेली नाही, तरीही या कॉलेजमध्ये मी प्राध्यापक कशी, असा सवाल तिने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना पत्र पाठवून उपस्थित केला आहे. शैक्षणिक कागदपत्रांचा दुरुपयोग झाला असून याची चौकशी करावी, अशी मागणी या महिलेने कुलगुरूंकडे केली आहे.
समितीनेही दिला बोगसचा अहवालकांबळे यांच्या तक्रारीनंतर विद्यापीठाने समिती नेमली. या समितीने संबंधित महाविद्यालयात जाऊन आढावा घेतला असता तिथे समितीला सगळेच कागदावर आढळून आले. त्यामुळे हे महाविद्यालय बोगस असल्याचा अहवाल विद्यापीठाला दिला असल्याचे समजते.
या प्रकरणात समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आला असून तो व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यात येईल. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ.