समीर देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत शाळा आणि अंगणवाड्यांसाठी संरक्षक भिंती, शौचालये यासाठी आग्रही मागणी करणाऱ्या गावांसाठी महाराष्ट्र शासनाने निधी मिळविण्याचा एक चांगला मार्ग दाखविला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक कामे करण्याची संधी गावांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिचा फायदा करून घेण्यासाठी मात्र गावागावांनी कंबर कसण्याची गरज आहे.
सध्या रोजगार हमीमधून कामे करण्यामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर आहे. पश्चिम बंगालचे या योजनेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटी रुपयांचे आहे, तर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशचे अंदाजपत्रक अनुक्रमे ८ आणि ५ हजार कोटी रुपयांचे आहे. महाराष्ट्र मात्र केवळ २४०० कोटी रुपयांवरच थांबला आहे. यासाठी आता रोजगार हमी योजनेतून विविध विकासकामे करण्याचा निर्धार महाराष्ट्र शासनाने केला आहे.
याचाच एक भाग म्हणून गावागावांत या योजनेच्या माध्यमातून कोणकोणती कामे करता येतील याचा अभ्यास केला जात आहे. यातूनच मग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांसाठी खालील कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खालील कामे पर्यावरणपूरक असल्याने लहान वयातच या प्रश्नांविषयीही मुला-मुलींमध्ये आस्था निर्माण होईल, असाही आशावाद व्यक्त केला जात आहे. अर्थात यासाठी ग्रामस्थांना रोजगार देण्यासाठी ६० टक्के आणि साहित्यासाठी ४० टक्के खर्च करण्याची अट कायम आहेच.
-------------------------------------------
जि. प. शाळा, अंगणवाड्यांमध्ये ही करता येतील कामे
१) शाळेसाठी कीचनशेड २) रेन वाॅटर हार्वेस्टिंग संरचना ३) शोषखड्डा ४) मल्टीयुनिट शौचालय
५) खेळाचे मैदान ६) संरक्षक भिंत ७) बिहार पॅटर्न वृक्षलागवड ८) परिसरात पेव्हिंग ब्लाक ९) परिसरात, बाहेर नाला बांधकाम १०) शाळा, अंगणवाडीकडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे
११) बोअरवेल पुनर्भरण १२) गांडुळ खत प्रकल्प १३) नापेड कंपोस्ट
-------------------------------------------
प्रधान सचिवांचा पुढाकार
रोजगार हमी योजनेचे महाराष्ट्राचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी याबाबत चांगलाच पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे अन्य निधीवर मर्यादा येत असताना रोजगार हमी योजनेद्वारे अधिक निधी मिळविण्याचा निर्धार त्यांच्या या विभागाने केला आहे. त्यामुळे या योजनेतून महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक निधी आणण्यासाठी नंदकुमार यांनी ७५ पानांचा सविस्तर शासन आदेश काढला आहे.