कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मारलेली दडी, साखर कारखान्यांनी उसाची बिले काढली नसल्याने फळ व कडधान्य मार्केटमध्ये कमालीची शांतता आहे. श्रावण महिना सुरू होऊन आठ दिवस झाले तरी फळांना फारशी मागणी दिसत नाही. गतवर्षीच्या तुलनेत निम्याहून कमी उलाढाल होत असल्याने सर्वत्र मंदीचे सावट दिसत आहे. भाजीपाला मार्केटमध्ये जेमतेम आवक असली तरी भाज्यांचे दर कमालीचे घसरले आहेत. श्रावण महिन्यात फळे, भाजीपाल्यांसह फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते पण यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सर्वच मार्केटवर परिणाम झाला आहे. फळ मार्केटमध्ये आवकही मर्यादित आहे, त्याबरोबर मागणीही नसल्याने मंदी दिसत आहे. मोसंबीची औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर येथून होणारी आवक अद्याप झालेली नाही. परिणामी बंगलोर, चेन्नई येथून होणाऱ्या आवकच सध्या बाजारात दिसत आहे. सीताफळची आवक सुरू आहे. पण सांगली, सोलापूर जिल्ह्यांत पाऊस नसल्याने आवकेवर मर्यादा आल्या आहेत. घाऊक बाजारात सीताफळाचा दर प्रति ढीग ५० ते २५०० रुपयांपर्यंत आहे. कडधान्य मार्केटमध्ये मंदी जाणवत आहे. साखरेचा दर स्थिर झाला असून किरकोळ बाजारात २८ रुपये किलोचा दर आहे. सरकी तेल, शाबू, मूग, मूगडाळीच्या दर स्थिर राहिले आहेत. भाजीपाला मार्केट गेले आठवड्याच्य तुलनेत घसरले आहेत. कोबी, वांगी, ढब्बू, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, वाल, प्लॉवरच्या दरात घसरण झाली आहे. गत आठवड्यात कोंथबीरचा दर शेकडा १६०० रुपये होता, त्यात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आली आहे. गवार, हिरवा टोमॅटोच्या दरात थोडी वाढ झालेली आहे. कणसांची आवक वाढली असून किरकोळ बाजारात दोन कणसांचा दर दहा रुपये आहे. पडवळ, मुळाची आवक वाढली आहे.
सुन्या..सुन्या.. या बाजारात! ग्राहकांची प्रतिक्षा
By admin | Updated: August 24, 2015 00:25 IST