इस्लामपूर (जि. सांगली) : साखराळे (ता. वाळवा) येथे आज पहाटे सहाच्या सुमारास एका ३२ वर्षीय महिलेने आपल्या दोन मुलांसह पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. महिलेसह तिच्या पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर ग्रामस्थांचा सतर्कपणा आणि धाडसामुळे तीन वर्षांची मुलगी मृत्यूच्या दाढेतून सुखरुपपणे बाहेर आली. सुप्रिया सुरेंद्र पाटील (वय ३२) व सुमित सुरेंद्र पाटील (५, रा. रेणुका मंदिरासमोर, साखराळे) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतून सोनाक्षी सुरेंद्र पाटील ही तीन वर्षांची बालिका बचावली. भाऊसाहेब दादू पाटील (५0) यांनी पोलिसांत वर्दी दिली. सुरेंद्र लक्ष्मण पाटील (३८) येथे एकत्र कुटुंबासह राहत. मुलगा सुमित मोठ्या गटात शिकत होता. त्याच्या अभ्यासावरून सुप्रियाची चिडचीड सुरु असायची. पहाटे सहा वाजता सुप्रियाने दोन्ही मुलांसह विहिरीत उडी मारली. या घटनेत सुप्रिया व सुमित हे दोघे पाण्यात बुडाले, तर मुलगी सोनाक्षी ही गटांगळ्या खात ओरडत होती. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून विकास तुकाराम महापुरे याने धाडसाने या विहिरीत उडी मारुन सोनाक्षीचे प्राण वाचविले. (वार्ताहर)
विहिरीत उडी मारुन मातेची मुलासह आत्महत्या
By admin | Updated: March 9, 2015 23:49 IST