* शिरोळ तालुक्यातील चित्र : शासनाकडून मदतीची प्रतीक्षा
संदीप बावचे : जयसिंगपूर
महापुरानंतर नदीकाठच्या ऊस शेतीचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. पिकातील दुर्गंधीबरोबरच जळण झालेल्या उसाचा काढणी खर्च परवडणारा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तसाच ठेवला आहे. तर बुडीत उसाला कोंब फुटले आहेत. साखर कारखान्यांकडून वेळेत बुडीत ऊस तोड होणार का, असा देखील प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यातच नदीकाठची वीज जोडणी नसल्यामुळे महापुरातून बचावलेला ऊस पाण्याविना वाळू लागला आहे.
जुलैमध्ये आलेल्या कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा नदीच्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील १७ हजार हेक्टरवरील ऊस पिकाला फटका बसला आहे. महापुरानंतर नदीकाठचा ऊस भकास दिसू लागला आहे. १५ ते २० टक्के ऊस पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. वाचलेल्या उसाला शेंडे फुटून कोंब येऊ लागले आहेत. त्याचा परिणाम ऊस पोकळ होऊन वजनात घट होणार आहे. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले पीक काढण्यासाठी एकरी दहा हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशा पिकातून काही उत्पन्न निघणार नाही, त्यामुळे शेत रिकामे करणे हाच एक पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला आहे. त्यामुळे वाळलेला ऊस कोणी जळणासाठी व वैरणीसाठी दिला जात आहे. बुडीत उसाला कारखान्यांनी प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
---------------
चौकट - वीज जोडणीची प्रतीक्षा
महापूर ओसरुन महिना उलटला तरी नदीकाठची वीज जोडणी नसल्यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अडचणीचे बनले आहे. पावसामुळे दिलासा मिळाला होता; मात्र पुन्हा कडक ऊन पडू लागल्याने पिके वाळू लागली आहेत.
कोट - महापुरात ४८ गुंठे उसाचे नुकसान झाले. नऊ महिन्याचा ऊस अक्षरश: वाळून गेला. ४० ते ४५ हजार रुपये खर्च आला होता. ऊस तुटून गेल्यानंतर दीड लाखाचे उत्पन्न मिळाले असते.
- आप्पासाहेब पाटील, शेतकरी राजापूर
-----------
कोट - महापुरामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे. शेती पिकवायची की नाही, असा प्रश्न आहे. महागाई, शासनाचे बदलते धोरण यामुळे शेतीच करायची सोडून द्यावी, असा विचार येऊ लागला आहे. २०१९ प्रमाणे शासनाकडून मदत मिळणे अपेक्षित आहे.
- सुरगोंडा कवंदे, शेतकरी दानोळी
फोटो - १६०९२०२१-जेएवाय-०१, ०२, ०३
फोटो ओळ - ०१) शिरोळ तालुक्यात महापुरात बुडीत झालेले ऊस पीक भकास दिसू लागले आहे.
०२ व ०३) बुडीत ऊस पिकाला कोंब फुटले आहेत. (सर्व छाया-भालचंद्र नांद्रेकर, दानोळी)