लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेचा खरेदी दर वाढवावा, यासाठी विविध राज्यांतील साखर उद्योगांशी संबंधित लोकांचे शिष्टमंडळ राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील आठवड्यात केंद्र सरकारला भेटणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मराठा आरक्षणप्रश्र्नी राज्य सरकार गंभीर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
पवार म्हणाले, ‘केंद्र सरकारने ऊसाची एफआरपी निश्चित केली आहे. मध्यंतरी इथेनॉलचा दरही चांगला वाढवून दिला. परंतु, साखरेची किंमत मात्र वाढवलेली नाही. सध्या साखरेचा केंद्रानेच निश्चित करून दिलेला किलोचा दर ३१ रुपये आहे. राज्य साखर संघाने तो किमान ३८ रुपये करावा, अशी मागणी यापूर्वीच केली आहे. परंतु, केंद्र सरकार त्याबाबतीत काही निर्णय घ्यायला तयार नाही. म्हणूनच महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशसह साखर उत्पादन करणाऱ्या राज्यांतील लोकांचे शिष्टमंडळ पुढील आठवड्यात केंद्र सरकारला भेटणार आहे. साखरेचा खरेदी दर वाढवून मिळावा, असाच आमचा प्रयत्न आहे अन्यथा कारखान्यांच्या अडचणी वाढतील व शेतकऱ्यांना ऊसाची बिले मिळणार नाहीत.
कृषी कायदे रद्द व्हावेत, यासाठी दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची तिन्ही कायदे रद्दच करा, अशी मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी समिती नेमली आहे, त्यातील सदस्यांनी आधीच या कायद्यांचे समर्थन केले आहे, त्यामुळे शेतकरी त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाहीत. या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातूनही एकत्रितपणे पाठिंबा द्यायचा विचार आहे, असे पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्र्नी २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने मी काही भाष्य करू इच्छित नाही. परंतु, दक्षिणेतील राज्यांनी ६० टक्के आरक्षण देऊनही तिथे कोणतीच स्थगिती नाही आणि महाराष्ट्राला मात्र वेगळा अनुभव येत आहे. राज्य सरकार या विषयात गंभीर आहे. त्यामुळे सरकारच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ याप्रकरणी न्यायालयात ताकदीने बाजू मांडतील, अशी व्यवस्था केली आहे.
राज्यपाल नियुक्त आमदार
मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने शिफारस करून दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे राज्यपालांनी अडवून ठेवणे, असे मागच्या ५० वर्षांच्या राजकारणात कधीही घडले नाही. परंतु, यावेळेलाच काहीतरी वेगळे घडले आहे, अशी टीका पवार यांनी केली. एकदा राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून प्रस्ताव पाठवला की, तो राज्यपाल मंजूर करत असत. परंतु, तसे यावेळेला घडलेले नाही.
मलाही उद्या मुख्यमंत्री व्हावे वाटले तर...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल केलेल्या विधानाची चर्चा सुरु आहे. तशी त्यांना संधी आहे का, असा प्रश्र्न पत्रकारांनी पवार यांना विचारला असता, पवार हसत म्हणाले, की मलाही उद्या मुख्यमंत्री व्हावे, असे वाटले तर काय करुया सांगा बरं...
सीरम जगन्मान्य संस्था...
पुण्यातील कोरोना लस तयार करणारी सीरम ही जगन्मान्य संस्था आहे. त्यांनी कोरोना लस शोधण्यात यश मिळवले. त्याचे समर्थन देशाच्या पंतप्रधानांनीही केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही या लसीला मान्यता दिली असताना आता त्याबद्दल कोणी काही बोलत असेल तर ते चुकीचे आहे. या संस्थेच्या प्रामाणिकपणाबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही, असे पवार यांनी सांगितले.