कोल्हापूर : शहरातील कोरोना संसर्गाच्या फैलाव रोखण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाने अचानकपणे एखाद्या चौकात जाऊन रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असून, गेल्या आठ दिवसांत ९०५ नागरिकांच्या केलेल्या चाचणीतून ३१ नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. या बाधित नागरिकांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांच्यापासून इतरांना होणाऱ्या कोरोनापासून वाचविणे शक्य झाले.
शहरात दि. २३ एप्रिलपासून मुख्य चौक, रस्ते, रेल्वे स्टेशन, भाजी मार्केट या ठिकाणी असलेल्या भाजी विक्रेते, नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये कोरोना बाधित आढळलेल्या ३१ नागरिकांना शिवाजी विद्यापीठ येथील डीओटी सेंटर येथे ठेवण्यात आले आहे. त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, शेजाऱ्यांना, ग्राहकांना होणाऱ्या कोरोनापासून वाचविणे महापालिका प्रशासनास शक्य झाले.
मागच्या आठ दिवसांत सनगर गल्ली, सी.बी.एस. स्टॅण्ड, गोकुळ हॉटेल, कनाननगर, संभाजीनगर पेट्रोल पंप, जाऊळाचा गणपती, बापट कॅम्प, सायबर चौक, राजारामपुरी भाजी मंडई, आर. के. नगर, राजेंद्रनगर, दसरा चौक, मरगाई गल्ली, रेल्वे स्टेशन, पितळी गणपती, रमणमळा, शिंगोशी मार्केट, नाना पाटीलनगर भाजी मार्केट, गोखले कॉलेज याठिकाणी रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या.
-तुळजा भवानी कॉलनी, पंचगंगा भाजी मंडईत पॉझिटिव्ह
गुरुवारी सकाळी तुळजा भवानी कॉलनी येथे ७२ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यावेळी दोन नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ७० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तसेच पंचगंगा घाटावरील भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते व नागरिक अशा १११ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये दोन भाजी विक्रेत्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शाहू टोल नाका येथे घेण्यात आलेल्या चाचणीत १९ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महापालिकेची तीन पथके या चाचणीसाठी सज्ज आहेत. या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे.