विश्वास पाटील - कोल्हापूरविधानसभा निवडणुकीला १९९५ मध्ये जशी स्थिती होती तसेच काहीसे वातावरण आता पाहायला मिळू लागले आहे. दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांची ‘पळा..पळा..कोण पुढे पळे तो’ अशी शिवसेना प्रवेशासाठी झुंबड उडाली आहे. ज्यांनी त्या पक्षांकडून सत्तेचे लोणी खाल्ले तेच आता पुन्हा सत्तेसाठीच शिवसेनेच्या दारात गेले असल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना-भाजपला पोषक वातावरण असताना विद्यमान आमदारांच्या विरोधात बंडखोरीस फूस देऊन वजाबाकीचे राजकारण खेळले जात आहे.गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसपेक्षा शिवसेनेतील घडामोडी जास्त आहेत. परवाच आमदार दिवाकर रावते, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शासकीय विश्रामधामवर थांबून शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या नेत्यांशी चर्चा केली; परंतु ते करताना कोण येईल, त्याला घ्या, असेच धोरण राहिले. गेल्या काही दिवसांपूर्वी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीच विद्यमान ४८ आमदारांची उमेदवारी निश्चित असल्याचे जाहीर केले आहे. त्यात एक-दोन जागांत फेरबदल होऊ शकतो; परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील तिन्ही आमदारांची उमेदवारी निश्चित मानली जाते. कागलमधून संजय घाटगे यांच्या उमेदवारीबद्दलही फारशी अडचण नाही. राधानगरीमधून प्रकाश आबिटकर व ‘स्वाभिमानी’चे जालंदर पाटील यांच्यात उमेदवारीसाठीच लढत होईल, असे दिसते; परंतु सध्या तरी त्या जागेवर आबिटकर यांचेच नाव पुढे असल्याचे दिसते. कोल्हापूर उत्तर, करवीर व हातकणंगले मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यास शिवसेनेतून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे शिवसेना सोडून अन्य पक्षांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा जिथे विद्यमान आमदार आहे तिथून उमेदवारी मागणे व त्याला पक्षाच्या नेत्यांनी प्रतिसाद देणे, यामुळे पक्षातूनच बंडखोरीस फूस दिली जात असल्याचे चित्र आहे. ‘कोल्हापूर उत्तर’मधून माजी महापौर सई खराडे यांनी आमदार व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. ज्या तीन मतदारसंघांत पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, तिथे पक्षांकडूनच अशा ‘उपऱ्या’ लोकांच्या उमेदवारीबद्दल स्पष्टता व्हायला हवी होती; परंतु तसे न करता विद्यमान आमदारांचीही अस्वस्थता वाढेल, असे राजकारण पक्षातूनच खेळले जात आहे. परवाच्या बैठकीला दोन्ही नव्या शहरप्रमुखांनाही निमंत्रित केले नव्हते. मग हे शहरप्रमुख क्षीरसागर सेनेचे आहेत की काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांनाही पडला आहे. चंदगडचे माजी आमदार नरसिंगराव पाटील हे सगळे पक्ष फिरून व त्या-त्या पक्षांकडून सगळ््या सत्तेचा लाभ उपटल्यानंतर आता पुन्हा शिवसेनेच्या दारात गेले आहेत. मंडलिक कोट्यातून ते दावेदार आहेत. येथे ही जागा आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना व स्वाभिमानी संघटना यांच्यात रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.जहाज बुडू लागले की सगळेजण पटापट उड्या मारू लागतात. काँग्रेसमधील काहींची सध्या तशीच स्थिती आहे; परंतु सत्ता नसताना गेली पंधरा वर्षे ज्यांनी शिवसेना जगवली त्या हाडाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाऊ नये, अशीच भावना जुन्या-जाणत्या शिवसैनिकांतून व्यक्त होऊ लागली आहे. असाच अनुभव यापूर्वी जेव्हा युतीची राज्यात सत्ता आली तेव्हा आला होता. -कोल्हापूर उत्तर : राजेश क्षीरसागर-करवीर : चंद्रदीप नरके-हातकणंगले : डॉ. सुजित मिणचेकर-कागल : संजय घाटगे (मंडलिक गट)-राधानगरी : प्रकाश आबिटकर (मंडलिक गट)शाहूवाडी-सत्यजित पाटील (शिवसेना)-भारत पाटील (स्वाभिमानी किंवा शिवसेना)
बंडखोरीस फूस देऊन शिवसेनेतूनच वजाबाकीचे राजकारण
By admin | Updated: July 22, 2014 00:42 IST