कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात झालेल्या ओल्या पार्टीचा अहवाल पुणे कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी गुरुवारी दुपारी महानिरीक्षक उपाध्ये यांच्याकडे पाठविला. या अहवालातून अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. साठे यांनी केलेली ही प्राथमिक चौकशी होती. त्यानंतर आणखी दोनवेळा चौकशी होणार असल्याने आणखी काही अधिकारी रडारवर येण्याची शक्यता आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुणे, मुंबई येथील कैद्यांनी अंडा सेल समोरच्या खुल्या जागेत पार्टी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याचे चित्रण वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी आलेल्या उपमहानिरीक्षक साठे यांनी गेले दोन दिवस कळंबा कारागृहात तपासणी व चौकशी केली. यामध्ये ही पार्टी झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी स्वाती साठे यांनी कारागृह अधीक्षक सुधीर किंगरे यांच्यासह तुरुंगाधिकारी उत्तरेश्वर गायकवाड यांची तडकाफडकी बदली केली, तर सुरक्षारक्षक (गार्ड) विजय पंडितराव टिपुगडे, मनोज माधू जाधव, युवराज शंकर कांबळे या तिघांना तातडीने निलंबित करण्यात आले. कारागृहाच्या अंडाबऱ्याकच्या (सेल) बाहेर मोकळ्या जागेत तीन विटांची चूल मांडून त्यावर चिकन शिजत ठेवले होते. याची क्लिप सर्व वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. त्याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली. त्याच्या चौकशीसाठी आलेल्या पुणे कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी गेल्या तीन दिवसांत कळंबा कारागृहात कसून तपासणीबरोबरच अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी केली. याबाबतच्या कारवाईनंतर साठे यांनी आपला गोपनीय अहवाल गुरुवारी दुपारी कारागृह महानिरीक्षक उपाध्ये यांच्याकडे मेलद्वारे पाठविला. त्यानंतर त्या सायंकाळी पाच वाजता पुण्याकडे रवाना झाल्या. उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी केलेली ही प्राथमिक चौकशी होती. त्यानंतर आणखी दोनवेळा चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. साठे यांनी पाठविलेल्या गोपनीय अहवालामध्ये कारागृहातील सुरक्षा व्यवस्था भेदून मोबाईल आत कसा गेला? चूल पेटविण्यासाठी आगपेटी कोठून उपलब्ध केली? कारागृहातील अंडाबऱ्याकच्या (सेल) मोकळ्या जागेत खुलेआम पार्टी करताना त्याची माहिती इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना कशी मिळाली नाही? या पार्टीत येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सहभाग होता का? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा या गोपनीय चौकशी अहवालात समावेश आहे. त्यामुळे या सर्व प्रकारास जबाबदार कोण? हेही या अहवालातून लवकरच स्पष्ट होणार आहे. कारागृह महानिरीक्षक उपाध्ये यांना पाठविलेल्या बंद गोपनीय अहवालातून अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस झालेली ही प्राथमिक चौकशी असून, त्यापाठोपाठ आणखी दोनवेळा या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे याप्रकरणी आणखी काही महत्त्वाचे अधिकारी व कर्मचारी कारवाईच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारागृहात झालेल्या कैद्यांच्या पार्टीचा प्रकार नेमका कधी घडला? तसेच असे प्रकार किती वेळा घडले आहेत? याबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे या अहवालातून मिळणार आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत या अहवालानुसार अनेकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे.
अहवाल महानिरीक्षकांकडे सादर
By admin | Updated: November 27, 2015 01:11 IST