कोल्हापूर : यंत्राने उसाची तोडणी केल्यास वजावट करावयाच्या पाचटाचे वजन निश्चित करण्यासाठी साखर आयुक्त स्तरावर १४ सदस्यीय अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली आहे. एप्रिल अखेरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. तोडणी यंत्राची वजावट पाच टक्क्यांऐवजी एक टक्काच करावी; अन्यथा कारवाई केली जाईल, या परिपत्रकाला १५ दिवसांचा कालावधी उलटत नाही तोवर याच्या फेरनिश्चितीसाठी थेट समिती नेमल्याने ही तत्परता नेमकी कुणासाठी, असा प्रश्न शेतकरी संघटनांकडून उपस्थित होत आहे.
यंत्राने तोडणी झाल्यास पाचट जास्त येत असल्याने एक टक्का वजावटीचा निर्णय अन्यायकारक असल्याने तो वाढवून देण्यासह तो कायमस्वरूपी निश्चित करून देण्याची मागणी व्हीएसआय, साखर संघ, डेक्कन व वेस्ट इंडियन शुगर इन्स्टिट्यूट या साखर कारखान्याशी संबंधित संस्थांनी केली होती. याविषयी सल्लामसलत केल्यास वाढीची मागणी करणाऱ्यांचाच समावेश करून अभ्यास समिती स्थापन केली आहे. याला विरोध करून आंदोलने करणाऱ्या शेतकरी संघटनेला मात्र यात पूर्णपणे वगळण्यात आले आहे. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे सुभाष घाडके यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीमध्ये साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक ५, कारखान्याशी संबंधित संस्थेचे २, कारखाना शेती अधिकारी १, कृषिभूषण शेतकरी २, आयुक्त कार्यालयातील साखर सहसंचालक १, राज्य साखर संघ १ असे एकूण १४ सदस्य आहेत. शेतकरी संघटनेच्या एकाही प्रतिनिधीला यात प्रतिनिधित्व दिलेले नाही. या वजावटीवर शेतकरी संघटनांनीच आवाज उचलूनही त्यांना डावलून समिती नियुक्त केल्याने यात शेतकऱ्यांचे किती भले होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चौकट ०१
वाहतुकीच्या अंतराच्या नियमाचा विसर
साखर कारखान्याकडून तोडणी ओढणीचा दर जास्त लावला जात असल्याच्या सततच्या तक्रारीनंतर वाहतूक दराचे साखर आयुक्त कार्यालयाकडून टप्पे ठरवून देण्यात आले. त्याला दोन वर्षे झाली तरी एकाही कारखान्याकडून त्याचे पालन होत नाही. मात्र वजावटीवर लगेच तत्परता दाखवली.
चौकट ०२
अशी आहे समिती
अध्यक्ष: सुभाष घोडके, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव
सदस्य सचिव: पांडूरंग शेळके, सहसंचालक, विकास साखर आयुक्त कार्यालय
सदस्य: पी.पी.शिंदे( व्हीएसआय पुणे), रामचंद्र माहुली (राजाराम कारखाना वाळवा कार्यकारी संचालक), मनोहर जोशी(जवाहर कारखाना हुपरी कार्यकारी संचालक),अ.बा.पाटील (सह्याद्री कारखाना कराड कार्यकारी संचालक), मानसिंग तावरे (अंबालिका शुगर कर्जत जनरल मॅनेजर ), यशवंत कुलकर्णी (पांडूरंग कारखाना माळशिरस कार्यकारी संचालक ), संजीव माने (कृषी भूषण उस तज्ञ आष्टा), पांडूरंग आवाड (कृषीभुषण शेतकरी शिरपूर उस्मानाबाद), रमेश कचरे (शेती अधिकारी गंगामाई कन्स्ट्क्शन अहमदनगर), संजय खताळ (राज्य साखर संघ), अजित चौगुले (शुगर मिल्स असोसिएशन पुणे), एस.एस.गंगावती (डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी पुणे)
प्रतिक्रीया
तोडणी यंत्रामुळे शेतकऱ्याला टनाला ५० किलोंचे नुकसान सोसावे लागते. कांड्या जास्त पडल्याने त्या वेचून कारखान्याकडे पाठवण्याचा अतिरिक्त खर्च करावा लागतो. आंदोलन करून निर्णय घेण्यास भाग पाडले; पण आता ऊस उत्पादकांच्या लुटीलाच अधिकृत करण्याचे प्रयत्न पाहता साखर आयुक्त साखर कारखानदाराचे प्रतिनिधी जास्त शोभतात.
- धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश