कोल्हापूर शहरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. रात्रभर हा जोर कायम होता; परंतु गुरुवारी मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. पाच दहा मिनिटे जोराचा पाऊस पडत रहायचा, नंतर मात्र उघडीप मिळत होती.
ग्रामीण भागात विशेषत: राधानगरी, गगनबावडा, करवीर तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. गुरुवारी सायंकाळी पंचगंगा घाट ओलांडून नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. नदीचे पाणी पाहण्यास नागरिकांनी गर्दी केली.
दरम्यान, जोरदार पावसामुळे शहरातील राजारामपुरी भाजी मंडई, रामानंदनगर, साने गुरुजी वसाहत अशा तीन ठिकाणी वृक्ष कोसळून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन कोसळलेले वृक्ष बाजूला केले. रामानंदनगर येथील ओढ्यात पडलेला वृक्ष जेसीबीच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आला.