कोल्हापूर : मोदी सरकारने भांडवलधार्जिणे धोरण स्वीकारताना कामगारहिताच्या अनेक कायद्यांत बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़ सरकारच्या या कामगारविरोधी धोरणांचा जिल्ह्णातील विविध कामगार संघटनांनी आज, शुक्रवारी टाउन हॉल बागेमध्ये तीव्र निषेध केला़ कामगार कायद्याच्या संरक्षणासाठी दीर्घकाळा लढा उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी देशभरातील अकरा कामगार संघटनांतर्फे निदर्शने करण्यात आली़ त्याचाच भाग म्हणून लाल बावटा कामगार संघटना, आयटक, सीटू, सर्व श्रमिक संघटना, अखिल भारतीय मजूर संघासह अन्य कामगार संघटनांतर्फे टाउन हॉल बागेमध्ये निदर्शने करण्यात आली़ यावेळी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा धिक्कार करणाऱ्या घोषणा देत कामगार संघटनांनी आगामी लढाईची एक चुणूकच दाखविली़ यावेळी कॉमे्रड अॅड़ गोविंद पानसरे म्हणाले, केंद्र सरकारने सध्याच्या कामगार कायद्यात दुरुस्ती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़ या कायद्यात दुरुस्ती झाल्यास कामगारांचे कामाचे तास वाढविण्यात येणार आहेत़ कामगार कपातीचे संकटही कोसळणार आहे़ कारखाने बंद करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळविण्यासाठी निर्धारित कामगार संख्येतही वाढ करण्यात आली आहे़ असे कारखाने संख्येने कमी असल्यामुळे कामगारांचा हक्कच धोक्यात येणार आहे़ महिलांनाही रात्रपाळीत काम करण्याचा प्रस्ताव दुरुस्तीमध्ये आहे़ त्यामुळे महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवणार आहे़ कामगारांच्या हक्कांवर बाधा आणणाऱ्या या धोरणाला विरोध करण्यासाठी कामगारांनी एकजुटीने लढले पाहिजे़ कॉम्रेड अतुल दिघे यांनी गेल्या सहा महिन्यांत कामगारांना काही ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसले नाहीत. कंत्राटी कामगारांचा लढा उभा केला पाहिजे, असे आवाहन केले़ कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी कामगार हक्कांच्या लढाईसाठी आता संघर्ष अटळ असल्याचे सांगितले़ यावेळी कॉम्रेड नामदेव गावडे, दिलीप पोवार, सतीशचंद्र कांबळे, बी़ एल़ बरगे, अॅड़ धरणकर यांची भाषणे झाली़
कामगार संघटनांची जोरदार निदर्शने
By admin | Updated: December 6, 2014 00:45 IST