कोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ची मतमोजणी रमणमळा परिसरातील बहुउद्देशीय सभागृहात झाल्याने कसबा बावडा मार्गावरील वाहतूक रमणमळा पोस्ट ऑफिस चौकातून धैर्यप्रसाद हॉलकडे वळविली होती तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. स्वत: अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे व शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण हे मतमोजणीस्थळी थांबून बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते.
गोकुळ निवडणुकीत मतमोजणीवेळी सत्ताधारी व विरोधी दोन्ही आघाडीत काट्याची टक्कर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मतमोजणीस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कसबा बावड्याकडे जाणाऱ्या मार्गावर जुने पोस्ट ऑफिस तसेच सत्र न्यायालयानजीक रस्ता आडवून वाहतूक वळवली होती. त्यामुळे मतमोजणी ठिकाणी जाणाऱ्यांची कसून तपासणी होऊन पास असल्याशिवाय परिसरात प्रवेश दिला जात नव्हता. याशिवाय मतमोजणी ठिकाणी बहुउद्देशीय सभागृह परिसरातही प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. तेथे स्वत: अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे व शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, तीन पोलीस निरीक्षक बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते.