लोकमत न्युज नेटवर्क
सेनापती कापशी : सेनापती कापशीसह (ता. कागल) परिसरातील गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सेनापती कापशी ग्रामपंचायत व कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीने संपूर्ण गाव दहा दिवस लाॅकडाऊन केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तातडीने गावातील सर्व रस्ते सील केले.
रविवार, दि. ९ ते बुधवार, दि. १९ मे पर्यंत दूध संकलन, दवाखाने व औषध दुकाने वगळता सर्व बाजारपेठ व व्यवहार बंद राहणार आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यास, दुकाने सुरू ठेवणाऱ्यास पाच हजार व खरेदी करणाऱ्यास एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच संबंधित दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असून, बाहेरून कोणीही येऊ नये.
सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचारी अथवा व्यक्तीशी उद्धट वर्तन करणाऱ्या अथवा माहिती लपविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
०८ सेनापती कापशी लॉकडाऊन
फोटो : सेनापती कापशी (ता. कागल) येथे कडकडीत लाॅकडाऊन करण्यात आला आहे. गावातील सर्व रस्ते कर्मचाऱ्यांनी सील केले.