वारणा नदीच्या दोन्ही तीरावरील सांगली जिल्ह्याच्या वाळवा व शिराळा तालुक्यांतील गावे व कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पन्हाळा तालुक्यातील गावे अशा सत्तर खेड्यातील लोक वारणा नदीवरील कोडोली-चिकुर्डे पुलावरून ये-जा करतात. दोन्हीही जिल्ह्यांत कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन कडक लॉकडाऊन या ठिकाणी सुरू केले आहे.
‘कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना अँटिजन अथवा आरटीपीसीआर तपासणी आवश्यक केली असून, अत्यावशक सेवा वगळता कोणालाही सोडले जात नाही. प्रत्येक वाहनधारकांची कसून तपासणी केली जात असल्याचे कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांनी सांगितले.
सध्या चिकुर्डे, अमृतनगर, एमएसईबी फाटा, बोरपाडळे यासह मोठ्या वस्तीच्या गावात पोलीस नाका, गस्त पोलिसांनी वाढवली असून, मोकाट फिरणाऱ्या वाहनधारकांची वाहने जप्त केली जात असून, सकाळी मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई केली. कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, पीएसआय नरेंद्र पाटील, सागर पवार, पोलीस कर्मचारी व होमगार्ड याकामी सतर्कपणे काम करीत आहेत.
फोटो ओळी- वारणानगर - चिकुर्डे मार्गावरील वारणा नदी पुलावर वाहनांची तपासणी करताना कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, पीएसआय नरेंद्र पाटील व पोलीस कर्मचारी.