लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा कोल्हापुरात उभारावा यासाठी ३५ वर्षांंपूर्वी प्रयत्न सुरू झाले. कालौघात ते शक्य झाले नाही. परंतु ३५ वर्षांपूर्वी चव्हाण यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वप्न आज वास्तवात येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेसमोरील चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जात आहे. महाराष्ट्रातील चव्हाण यांचा पुतळा उभारणारी ही पहिली जिल्हा परिषद असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.
चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर माजी महापौर बळीराम पोवार, कोल्हापूर हायस्कूलचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक विजयसिंह पाटील यांनी चव्हाण यांचा कोल्हापुरात पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी चव्हाण यांचे जवळचे संबंध असलेले श्रीपतराव बोंदरे यांच्याशी चर्चा केली. बोंदरे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना घेऊन समिती स्थापन करण्याची सूचना केली आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची कोल्हापुरात स्थापना झाली. यामध्ये भिकशेठ पाटील, एस. आर. पाटील, गनी फरास, माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव, के. ब. जगदाळे, वसंतराव मोहिते, के. जी. पोवार, जगन्नाथ पोवार, संभाजी पाटील यांचा समावेश होता. प्रत्येकाने पदरचे ५०० रुपये घालून निधी संकलनाला सुरुवात केली. ३५ हजार रुपये जमले. परंतु त्यावेळीही पूर्णाकृती पुतळ्यासाठी ४ लाखांवर खर्च येणार होता. अशातच श्रीपतराव बोंदरे आणि बळीराम पोवार यांचे दाेन महिन्याच्या अंतराने निधन झाले आणि या कामात खंड पडला. अनेक ज्येष्ठांचे निधन झाले.
परंतु विजयसिंह पाटील जे आजही घरातून बाहेर पडताना चव्हाण यांच्या प्रतिमेसमोर उदबत्ती लावून बाहेर पडतात. ते वयाची ८० वर्षे झाली तरी पुतळा न झाल्याने अस्वस्थ होते. आधीच्या पैशांचे चार लाख रुपये झाले होते. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अशोक पोवार, रमेश मोरे यांच्याशी संपर्क साधून पुतळ्याचा काय तो निर्णय घ्या असे सांगितले. या सर्वांनी बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असलेले व्ही. बी. पाटील यांची भेट घेतली. त्यांना प्रतिष्ठानचे अध्यक्षपद घ्यायला लावले आणि पुढची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पोवार, मोरे यांनी माणिक मंडलिक, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर यांना सोबत घेऊन तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांची भेट घेतली. जिल्हा परिषदेच्या आवारात पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळवली. अन्य प्रक्रिया पूर्ण केली आणि अखेर ३५ वर्षांपूर्वी विजयसिंह पाटील यांनी पाहिलेल्या एका स्वप्नाची पूर्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला.
चौकट
शहाजी महाविद्यालयात चव्हाण यांच्या अस्थी
श्रीपतराव बोंदरे आणि यशवंतराव चव्हाण यांचे जवळचे संबंध. त्यामुळे चव्हाण यांच्या निधनानंतर बोंदरे यांनी त्यांच्या अस्थी आणल्या आणि दसरा चौकातील शहाजी महाविद्यालयाच्या आवारातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर ठेवल्या. आजही येथे चव्हाण यांच्या जयंती आणि स्मृतीदिनी पूजा केली जाते. तसेच येथील सभागृहाला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले असून वेणूताई चव्हाण यांच्या नावे बीएचएमएस महाविद्यालय कार्यरत आहे.
२१०१२०२१ कोल व्ही. बी. पाटील
२१०१२०२१ कोल विजयसिंह पाटील
२१०१२०२१ कोल यशवंतराव चव्हाण ०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर उभारण्यात आलेला यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा
२१०१२०२१ कोल यशवंतराव चव्हाण ०२
दसरा चौकातील शहाजी महाविद्यालयात ठेवण्यात आलेल्या चव्हाण यांच्या अस्थी