इचलकरंजी : येथील एएससी कॉलेज परिसरातील विविध भागात गेल्या २१ दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणा होत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी शुक्रवारी त्याच परिसरातील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली. मुरदंडे मळा, बरगे मळा, पाटील मळा, प्रियदर्शनी कॉलनी, यशवंत कॉलनी, आदी भागांत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. या परिसरामध्ये गॅस पाइपलाइनचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणा-या पाइपलाइनला गळती लागली आहे. त्यामुळे भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी भेट देऊन दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
चौकट
पोलिस व आंदोलकांत वादावादी
अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिलांनी मुख्य मार्गावरील वाहतूक बंद केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे पोलीस व आंदोलकांत किरकोळ वादावादी झाली.
फोटो ओळी
१८०६२०२१-आयसीएच-०१
अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या कारणावरून संतप्त महिलांनी रास्ता रोको केला. यावेळी आंदोलक व पोलिसांत वाद-विवाद झाला.
१८०६२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत पाण्यासाठी मुख्य मार्गावर महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले.